मानसी जोशी
गेल्या काही वर्षांत चित्रपट असो वा मालिका.. त्या अधिकाधिक प्रभावी करण्यासाठी व्हीएफ एक्स तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी केवळ हॉलीवूडपटांमुळे माहिती झालेले हे तंत्रज्ञान आता टेलीविश्वावर गारूड करून आहे. या तंत्रज्ञानामुळे हिंदी आणि मराठी मालिकाविश्वात पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिका करणे सहजसाध्य झाले असल्याने या मालिकांची एकच लाट टेलीव्हिजनवर आलेली पाहायला मिळते. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदीतही ऐतिहासिकपट आणि अत्याधुनिक अॅक्शनपट यांचेही प्रमाण वाढले आहे. मराठीत ‘जय मल्हार’, ‘रात्रीस खेळ चाले’ यांसारख्या मालिकांमुळे या अत्याधुनिक तंत्राची ओळख प्रेक्षकांनाही झाली. मालिका-चित्रपटातून बदलत जाणारे तंत्रज्ञान, वाढत जाणारी बाजारपेठ याचा यानिमित्ताने घेतलेला आढावा..
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटात दिसणारे आकाशात विहरणारे पतंग, ‘बाहुबली’ या प्रभासच्या चित्रपटातील काही दृश्ये नव्हे तर कलाकारांचा अभिनय वगळता जवळपास सगळ्या गोष्टी, ‘रोबोट’मध्ये सुपरस्टार रजनीकांतचा बदललेला लूक, चित्रपटात नायकाने ठोसा लगावल्यावर स्लो मोशनमध्ये खाली पडणारे गुंड अशी अनेक छोटी-मोठी दृश्यं पडद्यावर पाहताना रंजक वाटतात, मात्र या सगळ्या दृश्यांमध्ये व्हीएफएक्स किंवा स्पेशल इफेक्ट्सचा किती प्रभावीपणे वापर करण्यात आला आहे हे आपल्याला सहज लक्षात येत नाही. ऐतिहासिक मालिकेतील देवीचा महाल, रावणाची दहा तोंडे, इंद्र, विष्णू, या देवांना दाखवण्यात आलेले हात, हवेत उडणारे देव ही सगळी या तंत्राचीच किमया आहे. पडद्यावर काही दृश्यांचे चित्रीकरण शक्य नसल्यास व्हीएफएक्सने काम केले जाते. यामुळे दिग्दर्शकाचा मोठा खर्च वाचतो. तसेच त्याला पडद्यावर विषय मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते.
भारतातील व्हीएफएक्सची बाजारपेठ अत्यंत मोठी असून त्यातले अर्थकारणही आता तितकेच वाढत चालले आहे. केपीएमजीच्या एका अहवालानुसार गेल्या दोन वर्षांत देशातील व्हीएफएक्सच्या बाजारपेठेत १६ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांकडून लवकरच व्हीएफएक्स तसेच अॅनिमेशन क्षेत्रासाठी पूरक अशा योजनांची घोषणाही करण्यात येणार आहे. व्हीएफएक्सच्या कामासाठी १० ते १५ लाख रुपये खर्च येतो. काही वर्षांपर्यंत व्हीएफएक्ससाठी अनेकदा परदेशी तंत्रज्ञांना पाचारण केले जायचे. परंतु ‘लाईफ ऑफ पाय’ आणि त्यानंतर आलेले माव्र्हलपट या चित्रपटांची कामे भारतीय स्टुडिओजकडे येऊ लागली. चित्रपटांच्या निर्मितीचे आर्थिक गणित वाढल्याने थ्रीडी आणि व्हीएफएक्स यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढतो आहे. हे करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. हॉलीवूडपटांच्या व्हीएफएक्सची अनेक कामे भारत, कोरियासारख्या देशांमध्ये केली जातात, कारण तिथे कुशल तंत्रज्ञ उपलब्ध आहेत. त्यामुळे या क्षेत्राची सर्वात मोठी बाजारपेठ ही प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपान, कोरिया या देशांची आहे, मात्र लवकरच भारत या देशांना मागे टाकेल असे चित्र निर्माण झाले आहे.
मराठी मालिकांमध्ये व्हीएफएक्स तंत्रज्ञान महेश कोठारे यांच्या निर्मिती संस्थेने पहिल्यांदा आणले. झी मराठीवर ‘अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी’ या शीर्षकगीतासोबत लागणाऱ्या ‘जय मल्हार’ या मालिकेने प्रेक्षकांना साडेतीन वर्षे याच तंत्राच्या बळावर खिळवून ठेवले होते. मल्हारदेव, म्हाळसा आणि बानूबाई यांची भूमिका घराघरात पोहोचली, परंतु त्याहीपेक्षा मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्स कौतुकाचा विषय ठरले. या मालिकेचे सहनिर्माते असलेले संतोष अयाचित यांनी व्हीएफएक्स वापरताना त्या काळातील अनेक बारकाव्यांचा अभ्यास केल्याचे सांगितले. ऐतिहासिक मालिकांमध्ये देव, देवींचा महाल यासाठी जास्त व्हीएफएक्स करावे लागते. त्या काळचे वातावरण व्हीएफएक्सच्या साहाय्याने उभे करताना तंत्रज्ञांना अधिक वाचन करावे लागते. ‘मार्तंड विजय’ या ग्रंथात कैलासाचे वर्णन दिले आहे. असे वर्णन मालिकेमध्ये उभे करण्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च येईल. परंतु व्यावहारिक दृष्टय़ा हे शक्य नसल्याने त्या वर्णनाच्या जवळ जाणारी दृश्ये साकारण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कलर्स मराठीवरील ‘लक्ष्मी नारायण’ मालिकेसाठी अनेक भव्यदिव्य सेट्स पडद्यावर साकारण्यात आले होते. अनेक प्रेक्षकांनी हे सेट्स कसे साकारले याबाबत विचारणा केली होती. ही किमया व्हीएफएक्सची आहे यावर प्रेक्षकांचा विश्वासच बसत नाही, असा अनुभवही त्यांनी सांगितला.
झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत गोळीच्या आवाजाने उडणारे कावळे, विहिरीतील गहिरे पाणी, विहिरीत बुडण्याची काही दृश्ये, अण्णांनी गोळी मारल्यावर पाटणकर बादलीतून बाहेर येतात असे दृश्य, अण्णांना होणारे भास, हवेत उडणारी बंदूक, ही दृश्ये व्हीएफएक्सच्या साहाय्याने करण्यात आली आल्याचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितले. सध्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे व्हीएफक्स करताना कामात सफाई येते आहे. ‘रात्रीस खेळ चाले’च्या पहिल्या भागात दाखवलेले मांजर, लागलेली आग ही आता अधिक चांगल्या रीतीने दाखवण्यात येईल. मालिकेच्या पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यासाठी पडद्यामागे मोठी व्हीएफएक्सची टीम २४ तास काम करत असते. दृश्यासाठी कोणते बॅकग्राऊंड वापरायचे, शॉट कसे घ्यायचे हे दिग्दर्शकाशी बोलून ठरवण्यात येते. मालिके च्या दृश्याची प्रक्रिया अत्यंत रंजक आहे. मालिकेत दृश्याचे चित्रीकरण झाल्यावर त्याचे संकलन करण्यात येते. मग त्याच्यावर व्हीएफक्स आणि ग्राफिक्सचे संस्कार केले जातात. नंतर त्यात बॅकग्राऊंड दिले जाते. या प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागतो, असे त्यांनी सांगितले.
स्टार भारत वाहिनीवर ‘जय माँ वैष्णोदेवी’ ही मालिका सध्या लोकप्रिय आहे. देवी वैष्णोदेवीच्या जन्मापासूनची कथा यात मांडण्यात आली आहे. या मालिकेसाठी व्हीएफएक्स करणाऱ्या टीममधील शुभांकर याने त्याचे अनुभव सांगितले. या मालिकेत एका दृश्यासाठी ‘मोशन सेन्सॉर’चे तंत्र प्रथमच वापरले गेले आहे. मालिकेत एखादे पात्र उडताना दाखवल्यास मोशन सेन्सरद्वारे पात्रांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवता येते. यासाठी लागणारा कॅमेरा आणि यंत्रसामग्री ‘रेड चिलीज’ या व्हीएफएक्स कंपनीकडून मागवण्यात आली होती. हे तंत्रज्ञान अत्यंत महागडे असून प्रत्येक दिवशीच्या यंत्रसामग्रीचा खर्च चार ते पाच लाख रुपयांच्या घरात जातो. ऐतिहासिक मालिकेसाठी व्हीएफएक्स करताना कलाकारांना चोवीस तासापेक्षाही कमी कालावधी मिळतो. या वेळेत बारकाव्यांसहित स्वर्ग, राणी अथवा राजाचा महाल, निर्माण करायचा असतो. मालिकेतील क्र ोमाचे चित्रीकरण झाल्यावर व्हीएफएक्स कलाकाराचे खरे काम सुरू होते, असेही शुभांकर याने सांगितले.
सिद्धेश वारे या व्हीएफएक्स कलाकाराने आतापर्यंत ‘नॉट अ लव्ह स्टोरी’, ‘डिपार्टमेंट’, ‘भूतनाथ रिटर्न्स’, ‘द अॅटॅक्स ऑफ २६/११’, ‘अब तक छप्पन २’ या मोठय़ा चित्रपटांसाठी व्हीएफएक्सचे काम केले आहे. त्याच्या मते चित्रपटासाठी व्हीएफएक्सचा वापर केल्याने दिग्दर्शकाचा खर्च वाचतो. या क्षेत्रात कामाचा दर्जा, पैसा आणि वेळ या तीन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. व्हीएफएक्सद्वारे पडद्यावरील दृश्यं जास्त जिवंत होतात. सध्या याचा वापर चित्रपट, मालिका आणि जाहिरातीत अनेकदा केला जातो. यात त्याने जाहिरातीमधील व्हीएफएक्सच्या वापराबाबत लक्ष वेधले. जाहिरातीमध्ये व्हीएफएक्सचा चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्यातील बारकावे व्हीएफएक्सने भरून काढण्यात येतात, असे त्याने सांगितले.
व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून काम आकारणाऱ्या प्रसाद चव्हाण यांनी सांगितले की चित्रपट आणि मालिकांमध्ये हाणामारीची दृश्ये, ऐतिहासिक चित्रपटातील तपशील व्हीएफएक्सच्या साहाय्याने तयार करण्यात येतात. आतापर्यंत आमच्या ‘ड्रीम कॅचर’ या कं पनीने‘वन्स मोअर’, ‘रंपाट’, ‘लकी’ आणि ‘चल जीवी लाईये’ या चित्रपटाचे व्हीएफएक्स केले आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या संजय जाधव दिग्दर्शित ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाचे व्हीएफ एक्सही त्यांनी केले आहे. चित्रपटात पतंग उडवण्याचे दृश्य असून यात बिस्किट खारीला पतंग आणून देतो. यामध्ये पडद्यावर अनेक पतंग दाखवण्यात आले आहेत. हे पतंग थ्री डी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले आहेत. यासाठी प्रथम पतंगाचे चित्रीकरण करण्यात आले. आणि नंतर विविध आकार आणि रंगाचे पतंग त्रिमितीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रेखाटले. पडद्यावर चित्रपटात प्रेक्षकांना अनेक पतंग उडत असल्याचा भास होतो. प्रेक्षकांना फार क्वचित व्हीएफएक्स आणि खरे चित्रण यातला फरक समजतो. व्हीएफएक्स मूळ दृश्यात इतके बेमालूमपणे मिसळण्यात येतात की पडद्यावर ते जास्त जिवंत वाटतात. या चित्रपटात २०१४ च्या क्रिकेट विश्वचषकाची दृश्ये निर्माण करण्यासाठीही व्हीएफएक्सचा आधार घेण्यात आला आहे. प्रसाद चव्हाण यांच्यासोबत नीतिकेश इंदलकर आणि अभय ठाकूर यांनी ‘वन्स मोअर’ या चित्रपटासाठी व्हीएफएक्स केले आहेत. ‘वन्स मोअर’मध्ये दाखवण्यात आलेला राणी महाल हे व्हीएफएक्सचे वरदान आहे. यात कॅमेरा ३६० अंश कोनात फिरवला होता. एका खोलीत दृश्यातील वस्तू आणि कलाकारांसोबत चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटासाठी अडीच ते तीन हजार फ्रेम्स तयार करणे हे व्हीएफएक्स कलाकारासाठी आव्हानात्मक होते. मराठी चित्रपटात सध्या व्हीएफएक्सचा वापर मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसून येतो आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी २० टक्के होणाऱ्या व्हीएफएक्सचा वापर दुपटीने वाढलेला असल्याचे प्रसाद चव्हाण यांनी सांगितले. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात व्हीएफएक्सच्या वापराबाबत निर्माते आणि दिग्दर्शक अधिक जागरूक आहेत.
व्हीएफएक्स सुपरवायजरचे वाढते महत्त्व
गेल्या काही वर्षांंपासून ‘व्हीएफएक्स सुपरवायजर’ या पदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. चित्रपट अथवा मालिकेच्या चित्रीकरण स्थळावर व्हीएफएक्स सुपरव्हायजर उपस्थित असतो. व्हीएफएक्ससाठी लागणाऱ्या दृश्याचे चित्रीकरण करताना पाहण्याची जबाबदारी हा माणूस पार पाडतो. अनेकदा मराठी चित्रपटात व्हीएफएक्स करताना चित्रीकरणस्थळी जाणे टाळले जायचे. परंतु त्यामुळे व्हीएफएक्स करताना अडचणीची परिस्थिती निर्माण व्हायची. दिग्दर्शकाच्या कल्पनेनुसार व्हीएफएक्स व्हायचे नाहीत. परंतु आता चित्रीकरण करताना व्हीएफएक्स सुपरवायझर जातीने हजर असतो, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. मराठी आणि हिंदी चित्रपट मालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने चित्रीकरणातील अडचणी कमी झाल्या आहेत, वेळ आणि खर्चातही कपात झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुंतागुंतीची कल्पना पडद्यावर उतरवणे सहजशक्य झाले आहे. सतत बदलत जाणाऱ्या व्हीएफएक्सच्या तंत्रज्ञानामुळे हिंदीत अथवा मराठीत व्हीएफएक्सचा संपूर्ण वापर असलेला चित्रपट तयार होण्यास वेळ लागणार नाही!