लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. अनेक दिवसांपासून ‘छावा’ कमाईचे अनेक विक्रम करीत आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरू होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित होताच एक वाद निर्माण झाला होता आणि तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे लेझीम खेळताना दाखवले गेले होते. अनेक प्रेक्षकांनी ट्रेलरमधील लेझीम दृश्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे लक्ष्मण उतेकर यांनी हे दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचं दृश्य चित्रपटातून काढून टाकण्यात आले असले तरी तेव्हा अनेकांनी यावर सकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या होत्या. आम्हाला आमच्या राजांना दोन मिनिटं का होईना लेझीम खेळताना पाहायला आवडलं असतं, अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या होत्या. अशातच अभिनेता म्हणजे आशीष पाथोडेनेही याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘छावा’मध्ये त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचे जवळचे सहकारी असणाऱ्या अंताजी यांची भूमिका साकारली आहे. ‘राजश्री मराठी’शी बोलताना त्यानं लेझीम दृश्यावर नाराजी व्यक्त केली.
त्या दृश्याबद्दल आशीष असं म्हणाला, “तो सीक्वेन्स असा होता की, आम्ही आलो, औक्षण झालं आणि सगळे नृत्य करीत आहेत. नगारे, ढोल असं सगळं वाजत होतं आणि अगदी उत्साह होता. त्यात लेझीमचं नृत्यपण सुरू होतं. मग लेझीम नृत्य करता करता दोन मावळे राजेंजवळ येतात आणि ते राजेंना सांगतात, “आमच्यासाठी करा ना…”. मग राजे राणी साहेबांकडे बघतात आणि राणीसाहेब पण फक्त इशारा करीत म्हणतात, “करा… आपली प्रजा आहे. तुम्ही करा”. मग राजे जातात आणि ते नृत्य करतात, जे सर्वांनी ट्रेलरमध्ये पाहिलं आहे. त्यानंतर मग राणीसाहेब आणि आम्ही सगळे मावळे त्यात सामील होतो. ते गाणं समाप्त होतं.”
पुढे त्यानं असं सांगितलं, “ते सगळं वातावरण इतकं सकारात्मक होतं की, कदाचित मला असं वाटतं प्रेक्षकांनी तो जो माहोल डोक्यावर घेतला असता. कारण- आपली ती श्रीमंती आहे. मराठी राजांचा इतिहास किती श्रीमंत होता? त्याचं ते सादरीकरण होतं आणि त्यात इतका प्रामाणिकपणा व सच्चेपणा होता की, तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लक्ष्मण सरांचा एक मावळा म्हणून, एक व्यक्ती म्हणून एक इतिहासप्रेमी म्हणून व दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक म्हणून शुद्ध हेतू होता. तो हेतू जर लोकांपर्यंत पोहोचला असता, तर सगळं काही वेगळ्या उंचीवर गेलं असतं.”
यापुढे आशीषनं म्हटलं, “बऱ्याच लोकांनी म्हटलं की, ते दृश्य असायला हवं होतं वगैरे… मी एका कीर्तनकारांचं रील पाहिलं. संपूर्ण जग चित्रपटाला डोक्यावर घेत आहे. मग आपलाच मराठी माणूस का असं हे म्हणतोय? दोन मिनिटं राजा हसताना बघवत नाही. ज्या माणसानं आपल्या स्वराज्यासाठी यातना सहन केल्या. खरंच त्यांची पुण्याई आहे की, त्यांनी हाल-अपेष्टा सहन केल्या म्हणून आपण सुरक्षित आहोत.”