संपूर्ण भारतीय कलाविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या मानाच्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये ‘अंधाधून’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे. तर ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विकीने त्याच्या भावना व्यक्त करुन अनेकांचे आभारही मानले आहेत.

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विकीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमधून त्याने अनेक गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. माझ्या कामासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही गोष्ट, माझ्यासह संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. मी या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या प्रवासात मला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार, असं म्हणत विकीने ही पोस्ट शेअर केली.

पुढे तो म्हणतो, हा पुरस्कार मी माझ्या आई-वडीलांना, उरी चित्रपटातील सर्व सदस्यांनी आणि देशाच्या सैनिकांना समर्पित करतो. त्यासोबतच अभिनेता आयुष्मान खुरानाचेही सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाल्यामुळे त्याचे अभिनंदन.

दरम्यान, ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’च्या यशानंतर विकीची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. सध्या विकी त्याच्या आगामी ‘सरदार उधम सिंह’ चित्रपटामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शूजित सरकार करत असून हा चित्रपट जालियनवाला बाग हत्याकांडमध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांनी घेतलेल्या बदल्यावर आधारित आहे.