अभिनेता विकी कौशल हा बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती लाभल्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटांचीही प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात. गेले काही महिने त्याच्या ‘सॅम बहादूर’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. भारतीय सैन्यातील पहिले फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा हा बायोपिक आहे. २०१९ ला या बायोपिकची घोषणा केली गेली होती. याचं दिग्दर्शन दिग्दर्शिका मेघना गुलजार करत आहेत. बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता विकी कौशल सैम मानेकशॉ यांची या बायोपिकमध्ये व्यक्तीरेखा साकारणार आहे. तर अभिनेत्री सान्या मल्होत्रा, फातिमा सना शेखही महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
विकी कौशलचा पहिला लूक २०१९ मध्ये रिलीज झाला होता. तर त्यापाठोपाठ या चित्रपटात अभिनेत्री सान्या मल्होत्रा सॅम मानेकशॉ यांची पत्नी सिल्लू मानेकशॉ यांच्या भूमिकेत तर अभिनेत्री फातिमा सना शेख श्रीमती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचंही स्पष्ट झालं होतं.
आणखी वाचा- मलायकाच्या व्हिडीओतील ‘तो’ ठरतोय सर्वांच्या नजरेत हिरो, ‘या’ कृतीचं होतंय कौतुक
आता विकी कौशलने चित्रपटाबाबत एक मोठा अपडेट देत चित्रपटाची उत्कंठा वाढवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असल्याचे सांगितले आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, “अखेर या खास प्रवासाची सुरुवात झाली. मी खूप कृतज्ञ आहे.” या व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाची जोरदार तयारी करताना दिसत आहे. चित्रपटाच्या पटकथेचं वाचन, चित्रपटाच्या संगीताची तयारी, कलाकारांची वेषभूषा ते पहिला शॉट हा संपूर्ण प्रवास या व्हिडीओमधून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सर्वजण चित्रपटाच्या शूटिंगसाठी फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा- विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार इंदिरा गांधी यांची भूमिका
सॅम मानेकशॉ यांनी आपलं संपूर्ण जीवन भारतासाठी व्यतीत केले. ते भारतीय सैन्याचे पहिले फिल्ड मार्शल होते. ज्यांच्या नेतृत्वात भारताने १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्ध जिंकले ज्यामुळे बांगलादेशचा जन्म झाला. बंगलादेशला स्वतंत्र देण्यात सॅम मानेकशॉ यांचा मोठा वाटा आहे. अशा एका थोर व्यक्तिमत्वाचा जीवनपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. विकीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर प्रेक्षकांसोबतच बॉलिवूडमधील काही कलाकारांनीही कमेंट्स करत संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.