भारतीय पुस्तकावर परदेशी सिनेमा निघाल्यानंतर त्याचे महत्त्व कळण्याचा दुसरा प्रकार स्लमडॉग मिलिऑनेरनंतर पुन्हा एकदा झाला आहे. विकास स्वरूप यांच्या ‘क्यू अ‍ॅण्ड ए’ कादंबरीवर डॅनी बॉएलने सिनेमा काढण्यापूर्वी ती वाचनीय कादंबरी विशिष्ट वाचनवर्तुळापुरती मर्यादित होती. चित्रपटानंतर तिचे नाव बदलले गेले आणि जगभर खपाच्या याद्यांमध्ये जाण्यासाठी मुक्तद्वार मिळाले. पत्रकार श्रावणी बसू यांच्या ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुला’ या सातेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एलिझाबेथ राणीच्या अज्ञात इतिहासाचा पुस्तकरूपी दस्तावेज नुकत्याच आलेल्या त्याच नावाच्या चित्रपटामुळे कुतूहल निर्माण करीत आहे. गेली सात वर्षे हे पुस्तक चर्चेत नव्हते. आता मात्र नव्या मुखपृष्ठासह आलेल्या पुस्तकावर २०१७मध्ये समीक्षक पंडितांच्या नव्याने उडय़ा पडत असून श्रावणी बसू यांनाही चित्रपटाने आंतरराष्ट्रीय प्रकाशझोतात आणले आहे. भारतीय (आणि पाकिस्तानच्याही) नागरिकांना इतिहासातून आणि चित्रपटांतून शिकविल्या-उमजल्या जाणाऱ्या क्रूर आणि कृतघ्न ब्रिटिश राजवटीसोबत या पुस्तकात आहे ते ब्रिटिश सम्राज्ञीच्या सरबराईसाठी भारतातून ब्रिटिश राजदरबारात दाखल झालेल्या विशेष सेवकाचे तेथे वाढत गेलेले महत्त्व आणि राणीचे औदार्य. बसू यांना ब्रिटनमध्ये लोकप्रिय असलेला ‘इंडियन करी’चा इतिहास शोधता शोधता अब्दुल करीम या ब्रिटिश राजदरबारामध्ये १८८७ सालात दाखल झालेल्या व्यक्तीविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले. राणीच्या वारसांनी, दरबारातील ब्रिटिश हुजऱ्यांनी नष्ट करण्याच्या प्रयत्नांमधूनही वाचलेल्या पत्रे, कागदपत्रांना हुडकून बसू यांनी राणी आणि तिच्या घनिष्ट सेवकाच्या मैत्रीचा पट पुस्तकरूपात मांडला. त्यावर स्टीफन फ्रिअर्स यांनी आपल्या आधीच्या चित्रपटांना साजेसा चित्रपट बनविला. ब्रिटिश भारतात चलनातील नाणी आणि पोस्ट तिकिटे यांच्यावर विराजमान झालेली आणि १८५७च्या मोडलेल्या बंडानंतरच्या सर्वस्वी भारताची कागदोपत्री अधिकृत राणी (ज्युडी डेन्च) एका सामान्य कारकुनाच्या लेखी काय असू शकेल याचे अब्दुल (अली फझल) आणि त्याचा भारतीय सहकारी महंमद (अदिल अख्तर) यांच्या प्रश्नार्थक अवस्थेतून या चित्रपटाला सुरुवात होते. मुंबईतून महिन्यांचा प्रवास करून जेव्हा ते दरबारात दाखल होतात तेव्हा तेथील शिष्टाचाराने अवघडून जातात. लवाजम्यासह राणीचा शाही आहार आणि तिच्या वृद्धापकाळातील वर्तणुकीचा सूक्ष्म अभ्यास ज्युडी डेन्च यांच्या अभिनयातून उतरला आहे. १९९७ साली राणीची मानवी पातळी दर्शविणारा तिच्या स्कॉटिश सेवकाचा ‘मिस्टर ब्राऊन’ नामक सिनेमा आला होता. ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ त्या चित्रपटाचा अनौपचारिक सिक्वल मानला जात असला, तरी तो तसा नाही. राणीच्या आयुष्यातील अखेरच्या पंधरा वर्षांचा कालावधी अब्दुल करीमने तिचा केवळ विश्वासच संपादला नव्हता, तर संपूर्ण राजघराण्यातील राणीच्या आप्तांचे जीवन ढवळून काढले होते. त्या सगळ्याचे गमतशीर तपशील चित्रपटात मांडण्यात आले आहेत. चित्रपट राणी आणि अब्दुलच्या वाढत जाणाऱ्या मैत्रीचा टप्पा अत्यंत बारकाईने विशद करतो. शिष्टाचार मोडून राणीला लोटांगण घालणाऱ्या भारतीय सेवकाला ती आपल्या ताफ्यात बोलावते. त्याच्याशी गप्पा मारताना भारताबद्दल न ऐकलेल्या, न जाणलेल्या गोष्टी समजून घेते आणि पाहता पाहता आपण राज्य करीत असलेल्या देशाची भाषा शिकण्याचा मनोदय अब्दुलकडे व्यक्त करते. अब्दुल तिला हिंदीऐवजी उर्दू शिकण्याचा आग्रह धरतो. राणी उर्दू शिकता शिकता अब्दुलाला आपल्या निकटवर्तीय सूत्रांमध्ये समाविष्ट करते. त्याच्याकडे दु:ख प्रगट करते, त्याला सल्ला मागते आणि त्याच्यासोबत लवाजम्याला घेऊन सहलीचा घाट घालते. या सगळ्या प्रकारात मत्सराने पोळलेला राजवाडय़ातील हुजऱ्यांचा ताफा अब्दुल करीमच्या विरोधात एकत्र येऊन राणीजवळ निषेध व्यक्त करतो. राणी त्यांना न जुमानता अब्दुल करीमवर आपले कृपाछत्र कायम ठेवते. राणीच्या अंतापर्यंत हा अतूट धागा कायम राहतो. चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे भारतीयांना शतकापूर्वी ब्रिटिशांकडून मिळणाऱ्या तुच्छ वागणुकीचे वैविध्यपूर्ण रंग जागोजागी पेरण्यात आले आहेत. चित्रपटात अब्दुल करीमच्या दरबारात वाढत जाणाऱ्या प्रस्थामुळे राणीच्या पुत्रापासून ते ब्रिटनच्या पंतप्रधानांचा कद्रूपणा बिनदिक्कत दाखविण्यात आला आहे. त्यावरून कुणाची मने वा भावना दुखावण्याचा किंवा राजघराण्यातील सन्माननीय व्यक्तींबाबत धाडसी चित्रण करण्याची भीती दिग्दर्शकाला नाही. भारतातून आलेले म्हणून अब्दुला करीम, महंमदला हिंदू संबोधण्याच्या ब्रिटिशांच्या गलतीसह कित्येक रंजक प्रकारांनी हा सिनेमा सजला आहे. ऑस्कर न पटकावताही त्या यादीत शिरकाव करणाऱ्याचा शिरस्ता गेली काही वर्षे पाळणाऱ्या या दिग्दर्शकाची यंदाही  ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’साठी ऑस्करस्पर्धेत वर्णी लागते का, हा चित्रप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय आहे. तूर्त तो ऑस्कर यादीत दिसला नाही, तरी भारतीय पुस्तकी इतिहासात फार न रंगविल्या गेलेल्या राणीबाबत अज्ञात असलेल्या बाबींसाठी पाहण्यास हरकत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा