‘वळू’, ‘गाभ्रीचा पाऊस’, ‘विहीर’, ‘जन्म’, ‘लालबाग परळ’ असे चित्रपट असोत, किंवा ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘एक रिकामी बाजू’, ‘दलपतसिंग येता गावा’, ‘खेळ मांडियेला’, ‘जंगल में मंगल’ यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणा-या वीणाने व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा चागंली कामगिरी केली आहे. वीणाची प्रमुख भूमिका असलेला ‘पलतडचो मुनिस’ हा कोकणी चित्रपट बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरॅन्टो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचे पारितोषिक मिळाले.
वीणा मूळची रायगड जिल्ह्यातल्या उरणची. बालवयातच तिचा रंगमंचावरचा प्रवास सुरू झाला. शालेय स्तरावर विविध नाट्य स्पर्धांमधून काम करत असतानाच तिच्या अभिनयक्षमतेची चमक दिसून आली. ‘उशीर होतोय’, ‘वैरी’ ही तिची काही गाजलेली बालनाट्यं. कलाप्रेमी आईवडलांचं भक्कम पाठबळ लाभलेल्या वीणाने अभिनयातच करियर करण्याचं ठरवलं. अभिनयाबाबत जागरूक असलेली वीणा प्रगल्भ व्यक्तिमत्वालासुद्धा तितकेच महत्त्व देते. वीणाच्या मते, ‘नुसती संवादफेक किंवा मेकअप म्हणजे अभिनय नव्हे. चांगला अभिनय करण्यासाठी तुमच्या आजूबाजूच्या घटनांशी तुमची नाळ जोडलेली असणं तेवढंच महत्त्वाचं आहे.  एक अभिनेत्री म्हणून मला वैयक्तिकरित्या वाटतं, अभिनेत्री म्हणून मला कमीत कमी मर्यादा असाव्यात. मला कुठल्याही प्रकारची भूमिका साकारता आली पाहिजे. एखाद्या सोज्वळ मुलीपासून ते खलनायिकेपर्यंत, अंगभर लुगडं नेसाणा-या स्त्रीपासून ते एखाद्या वेश्येपर्यंत कुठल्याही पद्धतीची भूमिका करता आली पाहिजे. कुठल्याही पद्धतीच्या सिनेमामध्ये मला काम करता आलं पाहिजे, असे मत वीणा जामकरने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले.
वीणा जामकरची सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा