Baipan Bhari Deva: बाईपण भारी देवा मधल्या काकडे सिस्टर्स एकमेकींपासून अगदी वेगळ्या असल्या तरी प्रेक्षकांमधील प्रत्येकीला आपल्यासारख्याच वाटत आहेत. म्हणूनच आज प्रदर्शनाच्या १० दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलचे बोर्ड झळकत आहेत. एखादा सिनेमा तयार होत असताना त्यातील प्रत्येक पात्राचा वेगळेपणा ठसठशीत दिसून येणं गरजेचं असतं. यासाठी जितक्या तगड्या लेखनाची आवश्यकता असते तितकेच महत्त्व वेशभूषा, रंगभूषेला सुद्धा असते. बाईपण भारी देवा सिनेमातील काकडे सिस्टर्समध्ये प्रत्येकीच्या स्वभावानुसार त्यांची वेशभूषा कशी घडत गेली याचा गमतीदार अनुभव वेशभूषाकार युगेशा ओमकार हिने आपल्या इंस्टाग्रामच्या खास सीरीजमध्ये शेअर केला आहे.
युगेशाने प्रत्येक पात्रासाठी कपडे निवडताना त्यांचा एकूण किती अभ्यास केले असेल ते या व्हिडिओतून स्पष्ट होते. साधना म्हणजेच सुकन्या मोने- कुलकर्णी यांनी साकारलेले पात्र हे अनेक गृहिणी व वर्किंग वुमन्सना आपलेसे वाटत आहे. त्याची मांडणी करताना युगेशाने साडी, ब्लाउज ते टिकली पासून प्रत्येक गोष्टीत एक खास संदेश दिला होता. युगेशा सांगते की, “साधनाचं आयुष्य हे खूप चौकटीत जगणारं आहे. वर्किंग वुमन असूनही ती स्वतंत्र नाही. त्यामुळेच तिला चेक्स म्हणजेच चौकटीच्या पॅटर्नचे साडी व ब्लाउज व अगदी टिकलीही देण्यात आली होती. जेव्हा शेवटी मंगळागौरीच्या गाण्यात ती प्लेन (विना डिझाईन) साडी नेसते तेव्हा ती तिच्या चौकटी मोडून बाहेर पडताना दाखवली आहे.”
युगेशाने साधनाच्या हातातील नटराजाच्या अंगठीचा सुद्धा खास किस्सा सांगितला आहे. ही अंगठी एरवी सुद्धा सुकन्या मोने कुलकर्णी यांच्या हातात असते. म्हणूनच ती सीनमध्ये वापरण्याचा निर्णय केदार शिंदे यांनी घेतला होता. “या निमित्ताने, सुकन्या मोने यांचं तरुणपणीचं पात्र साकारणाऱ्या त्यांच्याच लेकीसाठी म्हणजे ज्युलियासाठी त्यांनी हुबेहूब नटराज अंगठी बनवून घेतली होती.”
Video: अशी घडली बाईपण भारी देवाची ‘साधना’
दुसरीकडे, बाईपण भारी देवाचे दिग्दर्शक, केदार शिंदे यांनी सुद्धा युगेशाच्या कामाचे कौतुक करत आज एक खास पोस्ट लिहिली आहे. यात इतके सुंदर काम करूनही पुरस्कार मिळत नसल्याची खंतही केदार शिंदेंनी व्यक्त केली आहे.