शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत एनसीबीने १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानलाही ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर एनसीबीने आर्यनची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. त्याच्या सोबत इतर दोघांना एनसीबीने अटक केल्याचे समोर येत आहे. सध्या आर्यनचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
आर्यनच्या या व्हायरल व्हिडीओत तो एका बाकड्यावर बसला असल्याचे पाहायला मिळत आहे. तो बॅगेत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी त्याची सत्यता पडताळणी होऊ शकली नाही. तसेच या व्हिडीओ बाबत शाहरुख खान आणि त्याच्या वकिलांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांकडून ही या व्हिडीओबद्दलची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान ड्रग्ज कंट्रोल एजन्सीने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये आर्यन खानसोबतचं अटक झालेल्या आठ मुलांची नावे मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट अशी आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू असून त्यांनी दिलेल्या स्टमेंटनुसार पुढे कारवाई केली जाईल, असे एनसीबीने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान एनसीबीचे अधिकारी प्रवाशांच्या वेशात क्रूझवर चढले होते. मुंबईतून ही बोट निघाल्यानंतर त्यात पार्टी सुरु झाली जहाजने बेट सोडल्यावर पार्टी सुरू झाली. त्यानंतर रात्री उशिरा एनसीबीने छापेमारी केली. या छापेमारीच्या वेळेस मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी एकूण आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची मुंबईतील एनसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अनेकांनी ते सर्वजण पार्टीचा भाग असल्याची कबुली दिली आहे. तर काही जणांकडे ड्रग्स सापडल्याचेही बोललं जात आहे. यामुळे एनसीबीने आता आर्यन खानसह दोघांना अटक केली आहे. आर्यनला अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं आहे.
पार्टीमध्ये आर्यन खान का पोहचला होता?
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानला क्रूझवरील पार्टीमध्ये पाहुणा म्हणून बोलावण्यात आलं होतं. पार्टीत जाण्यासाठी त्याला कोणतेही पैसे भरावे लागले नव्हते. चौकशी दरम्यान आर्यन खानने कार्यक्रमाच्या आयोजकांना आपल्या नावाचा वापर करत इतरांना आमंत्रण दिलं असा दावा केला आहे.