मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मिश्रा यांची पत्नी यास्मीन यांनी दिलेल्या लेखी तक्रारीनंतर हा एफआयआर दाखल करुन देण्यात आला आहे. पतीने आपल्याला गाडीने चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मिश्रा यांच्या पत्नीने केला आहे.
मिश्रा यांनी १९ ऑक्टोबर रोजी आपल्या अंगावर गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. या अपघातामध्ये आपण गंभीर जखमी झालेलो असतानाही पतीने घटनास्थळावरुन पळ काढला, असं यास्मीन यांनी तक्रारीत म्हटलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही वृत्तसंस्थांनी शेअर केला आहे. या प्रकरणामध्ये अंबोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपण पतीला अन्य एका महिलेसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर त्याने गाडीने आपल्याला उडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मिश्रा यांच्या पत्नीने केला आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार यास्मीन यांनी दावा केला आहे की, मिश्रा हे एका मॉडेलबरोबर कारमध्ये रोमान्स करत होते. त्यावेळीच वेळी त्यांची पत्नी या गाड्या पार्कींगमध्ये दाखल झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरीमधील (पश्चिम) एका पार्किंगच्या ठिकाणी १९ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. यामध्ये मिश्रा यांची पत्नी जखमी झाली आहे. ‘शर्मा जी की लग गई’, ‘देहाती डिस्को’, ‘खली बली’बरोबरच अनेक चित्रपटांचे निर्माते असलेल्या कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात टीव्ही अभिनेत्री आणि पत्नी यास्मीनने आरोप केला आहे की नऊ वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं होतं. आता मात्र किशोर हे दुसऱ्या माहिलेसोबत रिलेशनमध्ये आहेत.
आपण पतीला मॉडेल आयशा सुप्रिया मेमनसोबत गाडीमध्ये रोमान्स करताना रंगेहाथ पकडल्याचा दावा यास्मीन यांनी केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. “मी गाडीच्या खिडकीच्या काचेवर हात मारला. तू थोडा वेळ बाहेर ये मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. त्यावेळी त्याने गाडी सुरु करुन वळवली आणि माझ्या पायावरुन घातली. या गोंधळात मी पडले आणि माझ्या पायाबरोबरच डोक्यालाही जखम झाली. डोक्याला कपाळाजवळ तीन टाके पडले. त्याने माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला,” असं यास्मीन यांनी म्हटल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
पोलिसांनी मिश्रा यांच्याविरोधात कलम २७९ आणि २२८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिश्रा सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.