दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला ओळखले जाते. समांथाने तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप पाडून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून २०१० साली टॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. नुकतंच समांथाने तिचा वाढदिवस साजरा केला. समांथाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता विजय देवरकोंडाने तिला एक खास सरप्राईज दिले आहे.
समांथा ही सध्या अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाचे शूटींग काश्मीरमध्ये सुरु आहे. समांथाच्या वाढदिवसानिमित्त या चित्रपटाच्या कलाकारांनी तिला एक खास सरप्राईज दिले आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत समांथा आणि विजय देवरकोंडा यांच्यात एक फेक सीन लिहिण्यात आला. हा एक प्रकारचा प्रँक होता.
या चित्रपटाची सर्व टीम ही त्या ठिकाणी उपस्थित असते. समांथाला खरोखरच चित्रपटाचा सीन सुरु असल्याचे वाटते. ती नेहमीप्रमाणे तिच्या सीनवर लक्ष देत असते. यानंतर तो सीन सुरु होतो. त्यावेळी समांथा ही विजयजवळ येते आणि रडत रडत एक डायलॉग बोलताना दिसते. यावर विजय तिचे डोळे पुसत ‘समांथा… हॅप्पी बर्थडे’ असे म्हणतो.
यानंतर तिला दोन मिनिटे काय सुरु आहे हे काहीही समजत नाही. त्यानंतर चित्रपटाची टीम तिच्यासाठी केक घेऊन येते. ती केक कापते आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन करते. यावेळी रडता रडता केक कापत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ विजयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. चला आता एक प्रेमकथा करुया. माझ्याकडून खूप प्रेम, असे कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिले आहे.
दरम्यान समांथा आणि विजय लवकरच एका रोमँटिक चित्रपटात झळकणार आहेत. दिग्दर्शक शिव निर्वाण हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्येही या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला. विजय आणि समांथासोबतची काही प्रमुख दृश्ये ही काश्मीरमध्ये शूट केली जाणार आहेत.
यानंतर उर्वरित शूटिंग अॅलेप्पी, हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे होणार आहे. या चित्रपटात कथा ही लष्कर जवानावर आधारित असल्याचे बोललं जात आहे. यात विजय हा लष्कर जवानाच्या भूमिकेत असणार आहे. येत्या वर्षात या शूटींगला सुरुवात होणार असून पुढील वर्षी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.