आमिर खान आणि अमिताभ बच्चन या दोन कलाकारांसाठी निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा हे नाव खास आहे. विधू विनोद चोप्रा यांची निर्मिती किंवा दिग्दर्शन असलेल्या चित्रपटांनी दोन्ही कलाकारांना कारकिर्दीतील सर्वाधिक हिट चित्रपट मिळवून दिले आहेत. किंबहुना, चोप्रांसाठीही या दोघा कलाकारांचे महत्व काही और आहे. म्हणूनच आपल्या पहिल्यावहिल्या हॉलिवूड दिग्दर्शन असलेल्या ‘ब्रोकन हॉर्सेस’या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यासाठी विधू विनोद चोप्रांनी अमिताभ आणि आमिर खान यांना एकाच व्यासपीठावर आणले. यानिमित्ताने, या दोन्ही कलाकारांसाठी एक तरी इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करायची इच्छाही विधू चोप्रा यांनी बोलून दाखवली.
निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार चित्रपटनिर्मितीच्या अनेक क्षेत्रात विधू विनोद चोप्रा हे नाव नावाजलेले आहे. त्यामुळे इतक्या वर्षांनंतर का होईना इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे आपले स्वप्न विधू विनोद चोप्रा यांनी पूर्ण केले आहे. ‘फॉक्स स्टार स्टुडिओ’ची निर्मिती असलेला ‘ब्रोकन हॉर्सेस’ हा हॉलिवूडपट १० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे उद्घाटन अमिताभ बच्चन आणि आमिर खानच्या हस्ते करण्यात आले. हा विधू विनोद चोप्रा यांचा पहिलाच हॉलीवूडपट असल्याने आपल्यासाठी हा चित्रपट खास का आहे याचे कारण समजावून सांगताना विधू विनोद चोप्रा यांनी आपण आतापर्यंत हिंदी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या होत्या. अभिजात जोशी आणि मी आम्ही दोघंही हिंदी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी, आमचे आजवरचे कामही हिंदी चित्रपटांतून झाले असल्याने आम्ही एका इंग्रजी चित्रपटाची पटकथा लिहित आहोत हे ऐकल्यावर अनेकांनी खिल्ली उडवली होती. त्यामुळे हा चित्रपट करायचाच असा निर्णय मनाशी पक्का झाल्याचे चोप्रा यांनी सांगितले. आता केवळ पटकथाच नव्हे तर ब्रोकन हॉर्सेस हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असल्याचे पाहिल्यावर इंडस्ट्रीतील लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील याची उत्सुकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ब्रोकन हॉर्सेसनंतर अमिताभ बच्चन आणि आमीर खान या हिंदीतील दोन सर्वोत्तम कलावंतांसाठी आपल्याला इंग्रजी चित्रपट करायची इच्छा आहे असे चोप्रा यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांनी याआधी द ग्रेट गॅट्सबी या हॉलीवूडपटात काम केले आहे. तर आमिरने अद्याप एकही हॉलीवूडपट केलेला नाही. मात्र हॉलीवूडपट करायची आपल्याला फारशी इच्छा नसल्याचे आमीरने यावेळी स्पष्ट केले. त्यातही एखादी चांगली पटकथा मिळाली तर विचार केला जाऊ शकतो. पण खास त्यासाठीच प्रयत्न करणार नसल्याचे आमिर म्हणाला. तर अमिताभ बच्चन यांनीही हॉलीवूड आणि हिंदी चित्रपट असे दोन पर्याय समोर ठेवल्यास हिंदीलाच आपले प्राधान्य असेल असे स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा