दोन वर्षांपूर्वी ‘कहानी’ आणि ‘डर्टी पिक्चर’सारख्या चित्रपटांमधून अभिनेत्री विद्या बालनने केवळ प्रेक्षकांवरच नव्हे तर चित्रपटविश्वातील निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार सगळ्यांवर एवढा प्रभाव टाकला होता की तिला बॉलीवूडची ‘हिरो’ असा किताबच त्यांनी दिला. तेव्हापासून नायिकाप्रधान चित्रपटांचा एक प्रवाहच बॉलीवूडमध्ये सुरू झाला आहे. नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी ३६ व्या वर्षांत पदार्पण केलेल्या विद्याने या वर्षी आपण अधिक चांगल्या आणि वेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
वाढदिवस आणि नववर्षांचे स्वागत या दोन्ही गोष्टी एकत्रच साजऱ्या करण्याची तिची वर्षांनुवर्षांची परंपरा याही वर्षी तिने पाळली आहे. मी कुठल्याही कार्यक्रमाला गेले तरी त्या दिवशी रात्री पावणेबारा वाजता मी घरी पोहोचते. त्यांच्याबरोबर हा क्षण व्यतीत करणे हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे, असे ती म्हणते.  वाढदिवसाच्या दिवशी खरे तर आईच्या हातचे पायसम आणि तिखट म्हणून अवियल हे दोन पदार्थ मला खूप आवडतात. विवाहानंतर या गोष्टींसाठी फारच खटाटोप करावा लागतो, असे तिने सांगितले. नव्या वर्षांत ‘हमारी अधुरी कहानी’ या मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपटांतून आपली वेगळी भूमिका पाहायला मिळेल, असे तिने सांगितले. मला तुमच्याबरोबर काम करायचे आहे, असे एखाद्या दिग्दर्शकाला सांगण्याचा प्रकार मी कधीच करीत नाही. पण, ‘आशिकी २’ पाहिल्यानंतर मी थेट मोहितला बोलले आणि त्याने ‘हमारी अधुरी कहानी’सारखी वेगळी कथा माझ्या हातात ठेवली, असे सांगणाऱ्या विद्याने हा चित्रपट आणखी एका गोष्टीसाठी खास असल्याचे सांगितले. दिग्दर्शक-निर्माता महेश भट्ट यांच्या पत्नीवर हा चित्रपट बेतलेला आहे. महेश भट्ट यांच्या ‘अर्थ’चा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याची खूप इच्छा होती. या चित्रपटात लेखक म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे.