बॉलिवूडमधील बायोपिकच्या ट्रेण्डमध्ये आणखी एका बायोपिकची भर पडली आहे. बसपा अध्यक्ष मायावती यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती होत असून या बायोपिकमध्ये अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिका साकारणार आहे. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बायोपिकची निर्मिती झाली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्याही बायोपिकची चर्चा सुरु आहे.
‘जॉली एलएलबी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष कपूर मायावती यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. मायावती यांच्या भूमिकेसाठी ७-८ अभिनेत्रींच्या नावांचा विचार सुरू होता, मात्र अखेर विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या चित्रपटाचे नाव काय असेल किंवा चित्रीकरणाला कधीपासून सुरुवात होईल या गोष्टी अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मायावतींच्या बायोपिकसोबतच विद्या एका वेबसीरिजमध्ये दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका वठवत आहे. त्यासोबतच ती सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटातही काम करत आहे.या चित्रपटामध्ये विद्या एनटीआर यांच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे.