बॉलिवूड स्टार विद्या बालन सलग तिसऱ्या वर्षी मेलबर्न भारतीय चित्रपट मोहोत्सवाची(आयएफएफएम) ब्रँड अम्बॅसिडर म्हणून काम पाहणार आहे.
व्हिक्टोरीया सरकारचे व्यापारी शिष्ठमंडळ भारतात आले असताना विद्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘परिणीता’, ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘कहाणी’ सारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे विद्या बालनची चित्रपटसृष्टीमध्ये एक विशिष्ट ओळख तयार झाली आहे.
“व्हिक्टोरीयाच्या आघाडी सरकारने मेलबर्नमध्ये होणाऱ्या भारतीय चित्रपट महोत्सवाला एका वर्षासाठी सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचा ठराव केला आहे. या निर्णयामुळे व्हिक्टोरीया आणि भारतीय चित्रपट उद्योगामधील संबंध मजबूत होण्यासाठी निश्चित फायदा होणार आहे,” असे व्हिक्टोरीयाचे सेवा आणि लघु उद्योग मंत्री लुईस आशेर म्हणाले.
विद्या बालनला पुन्हा एकदा या महोत्सवाची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून घोषणा करताना आनंद होत असल्याचे आशर म्हणाले. विद्या बालनने देखील ‘आयएफएफएम’ची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून तिसऱ्यांदा निवड झाल्यावर आनंद व्यक्त केला आहे.
“मेलबर्न चित्रपट महोत्सव माझ्या हृदयाच्या जवळ आहे. तरूण व उद्योन्मुख चित्रपट निर्मात्यांसाठी या चित्रपट महोत्सवाने चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.,” असे विद्या म्हणाली.

Story img Loader