देशोदेशीच्या मादक ललनांना उंची वस्त्रांमध्ये मिरवून घेण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या दक्षिण फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच अवतरलेल्या विद्या बालन हिने भारतीय पोशाख परिधान करून सर्वाना सुखद सौंदर्यधक्का दिला. लाल रंगाच्या सब्यसाची लेहेंगा परिधान केलेल्या विद्याने कान महोत्सव गाजविण्याची नांदीच आपल्या या कृतीतून दिली. विद्या या महोत्सवात आठ सदस्यांच्या परीक्षक मंडळामध्ये आहे. येथील मार्टिन्झ हॉटेल येथे महोत्सवाच्या सुरुवातीला देण्यात येणाऱ्या कॉकटेल पार्टीमध्ये विद्या बालन हिने देशी पोशाखात दर्शन दिले.
यापूर्वीच विद्या बालन हिने कान महोत्सवातील ‘रेड कार्पेट’वर आपण केवळ भारतीय पोशाखात अवतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार तिने आपला देशीवाद खरा ठरवला. या चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल आणि ज्युरी सहकारी म्हणून महान कलाकार सोबत असल्याबद्दल विद्याने आनंद व्यक्त केला.

Story img Loader