‘बॉबी जासूस’ आणि त्या चित्रपटाची गुप्तहेर नायिका विद्या बालन सध्या चर्चेत आहे ते या चित्रपटात तिने धारण केलेल्या विविध अवतारांमुळे. ‘बॉबी जासूस’चे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हा भिकाऱ्याच्या वेशातील विद्याला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात बघताक्षणी विद्याला ओळखणे कठीण होते. अगदी हा लुक केल्यानंतर त्याच वेशात अगदी शांतपणे सेटवर पोहोचलेल्या विद्याला अगदी दिग्दर्शकानेही ओळखले नाही, असे विद्याच्या या जासूसी अवताराचे किमयागार मेकअपमन विद्याधर भट्टे यांनी ‘रविवार वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
१९७४ पासून बॉलीवूडमध्ये कलाकारांच्या चेहऱ्यावर रंग चढवण्याचे काम विद्याधर भट्टे करत आहेत. दिलीपकुमार, अमिताभ बच्चन यांच्यापासून ते राणी मुखर्जी, विद्या बालनपर्यंत अनेकांना कॅमेऱ्यासाठीचा देखणा चेहरा भट्टे यांनी करून दिला आहे. विद्या बालनसाठीही ते गेली कित्येक र्वष काम करत आहेत. मात्र ‘बॉबी जासूस’च्या निमित्ताने विद्याला एकदम वेगवेगळ्या अवतारात सादर करण्याची संधी भट्टे यांना मिळाली. या चित्रपटासाठी विद्याचे जवळ जवळ १२२ लुक्स घेण्यात आले होते, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. विद्यासाठी लुक्स निवडणे, त्यानंतर त्याचे रेखाटन आणि मग तो लुक निश्चित करणे अशी प्रक्रिया सुरू होती, असे निर्मात्यांकडून सांगण्यात येत असले तरी मला दिग्दर्शकाने निवडलेले लुक्स रुचले नव्हते, असे भट्टे सांगतात. ‘बॉबी जासूस’ची पटकथा माझ्या हातात ठेवण्यात आली होती. ती मी वाचून काढली. त्याचे संदर्भ लक्षात घेतले. त्याच वेळी दिग्दर्शक समर शेखने माझ्या हातात त्यांनी ठरवलेले काही लुक्सचे संदर्भ दिले आणि दोन्हीचा अभ्यास करून माझ्या कामाची सुरुवात करावी, असेही सुचवले. पण काही केल्या दिग्दर्शकाने ठरवलेले लुक्स आपल्याला पसंत नव्हते, असे भट्टे म्हणतात.
भट्टे यांनी दिग्दर्शकाला आपण आपल्या पद्धतीने लुक्स करून देतो, असे सांगितले. अर्थात भट्टे यांना होकार देताना भाडय़ाचे केसाचे विग, कपडे अशा गोष्टी वापरून हे लुक्स लवकरात लवकर करावेत, असे दिग्दर्शकाने त्यांना सुचवले होते. मी गेली ३५ र्वष या व्यवसायात आहे. मला विद्याच्या लुक्ससाठी बाहेरून काही आणण्याची गरजच नव्हती, असे त्यांनी विश्वासाने सांगितले. विद्याला या लुक्समध्ये फिट बसायचे असेल तर तिच्यासाठी माझ्याकडे असलेल्या सामानातूनच वेगळे काहीतरी करण्याची गरज होती. भरीस भर म्हणजे एका दिवसात विद्याचे हे लुक्स सादर करून ते निश्चित करायचे होते. मी तुम्हाला एकापाठोपाठ एक लुक्स करून देतो, असे भट्टेंनी सांगितले. आणि मग ज्योतिषी, शिपाई, भिकारी असे विद्याचे एकेक अवतार साकारत गेले. भट्टेंच्या कामाचा झपाटा आणि विद्याचे अफलातून नवे अवतार पाहून भारावलेल्या दिग्दर्शकाने त्यांना त्यांच्या पद्धतीने सर्व काही साकारण्याची मुभा दिली. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर समोरच्या चेहऱ्यासाठी काय क रावे लागेल, हे सहजी लक्षात येते. मुळात इथे विद्याच्या अभिनयाचा कस लागणार होता. मला प्रॉस्थेटिक मेकअपसारख्या तंत्रांचा वापर करून उगाचच माझी कला चित्रपटात दाखवणे अपेक्षित नव्हते. त्यामुळे कुठल्याही मेकअप पद्धतींचा वापर न करता तिचे लुक्स तयार करणे हे एक आव्हान होते. पण विद्या जेव्हा या लुकमध्ये सेटवर गेली तेव्हा अगदी दिग्दर्शकानेही तिला ओळखले नाही इतके  हे लुक जमून आले आहेत, असे भट्टे यांनी सांगितले.
विद्याला तिचे सहा लुक्स पसंत पडलेच, पण या चित्रपटाची निर्माती दिया मिर्झानेही भट्टे यांच्या या कलेची मनापासून तारीफ केली आहे. ‘बॉबी जासूस’मधील विद्याचे वेगवेगळे अवतार ही या चित्रपटाची जान आहे. आणि भट्टेंसारख्या अनुभवी मेकअपमुळेच ही किमया साध्य झाली आहे, अशा शब्दांत दियाने भट्टे यांचे कौतुक केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा