बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालच्या आगामी जंगली चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला. प्रदर्शित झालेला ट्रेलर अॅक्शनपॅक्ड असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे हा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. हा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या सोशल मीडियावर तो शेअर केला आहे.

२.४७ मिनीटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला चित्रपटातील पात्रांची ओळख करुन देण्यात येत आहे. या चित्रपटात विद्युतने एका पशुचिकित्सकाची भूमिका वठवली असून त्याच्या मित्राचं म्हणजे हत्तीचं नाव ‘भोला’ असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये विद्युतव्यतिरिक्त अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री पूजा सावंत हे दोन मराठी कलाकारही झळकले आहे. पुजा सावंतने या चित्रपटात ‘शंकरा’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे,तर अतुल यांनी हत्तींची शिकार करणाऱ्या शिकारीची.

दरम्यान, या ट्रेलरमधून माणूस आणि प्राण्यांच्या अतूट मैत्रीचं दर्शन घडविण्यात येत आहे. मंगळवारी या चित्रपटाचं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटातून हस्तीदंतांच्या तस्करीसाठी हत्तींची होणारी शिकार, या रॅकेटचा आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला संबंध या साऱ्यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये नाट्यमय घडामोडी आणि अॅक्शनपॅक्डचा भरणा केल्याचं दिसून येणार आहे.

‘जंगली पिक्चर्स’ची निर्मिती असलेला हा चित्रपट दिग्दर्शक चक रसेल यांनी दिग्दर्शित केला आहे. विनीत जैन या चित्रपटाचे निर्माते असून प्रीती शहानी सहनिर्मात्या म्हणून या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत.

Story img Loader