बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुखचा ‘फॅन’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. शाहरुखची दुहेरी भूमिका असलेल्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं होतं. यातील गाण्यांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं होतं. ‘जबरा फॅन’ या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंतीही मिळालेली. याच गाण्याने आकर्षित होऊन अनेकजण शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले. मात्र, प्रेक्षकांची निराशाच झाली. कारण ज्या गाण्याला प्रमोशनमध्ये वापरलं गेलं, तेच गाणं नेमकं चित्रपटातून काढून टाकण्यात आलं. निराश झालेल्यांपैकी एका प्रेक्षकाने या विरोधात थेट ग्राहक न्यायालयात धाव घेतली.

औरंगाबादच्या २७ वर्षीय शिक्षिका आफरीन जयदीने निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली. मात्र, २०१६ मध्ये न्यायालयाने तिची तक्रार फेटाळली होती. त्यानंतर याच महिन्यात महाराष्ट्र स्टेट कंज्युमर डिस्प्यूट रिड्रेसल कमिशनच्या औरंगाबाद सर्कल बेंचने आफरीनचा तर्क योग्य ठरवला. निर्मात्यांनी प्रेक्षकासोबत अन्याय केल्याप्रकरणी ‘यश राज फिल्म्स’ला आफरीनला १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. यामध्ये मानसिक त्रास झाल्यामुळे १० हजार रुपये आणि तक्रार दाखल करण्यासाठी खर्च केलेल्या ५ हजार रुपयांचा समावेश आहे. आफरीनने निर्मात्यांकडून ६५ हजार ५५० रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.

वाचा : …अन् कपिलची कथा अर्ध्यावरच संपली 

प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटांतील प्रमोशनल गाणी आधीच प्रदर्शित केले जातात. अनेकदा या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते आणि त्याच आधारावर अनेकजण चित्रपट पाहायला जातातही. मात्र, चित्रपटाच्या पटकथेशी विसंगती होत असल्याने अशी गाणी त्यातून वगळली जातात किंवा चित्रपटाच्या शेवटी दाखवली जातात. यामुळे प्रेक्षकांची निराशा होते.