दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे. लवकरच त्याचा ‘लायगर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता जास्तच ताणली गेली. सध्या विजय त्याच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच त्यानं या चित्रपटाचं मुंबईमध्ये प्रमोशन केलं. यावेळचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण त्याच्या एका व्हिडिओने सगळ्या मराठी चाहत्यांची मनं जिंकून घेतली. या व्हिडिओमध्ये विजय देवरकोंडा चक्क मराठीमध्ये बोलताना दिसला.
‘लायगर’च्या मुंबईमधील प्रमोशनच्या वेळी मराठी बोलण्याचा मोह विजयला आवरता आला नाही. मराठी बोलतानाचा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. ‘लायगर’ची संपूर्ण टीम प्रमोशनसाठी नवी मुंबईतील एका मोठ्या मॉलमध्ये पोहोचली होती. आपल्या आवडत्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या वेळचा विजय देवरकोंडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यात तो मराठी बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा- दारु, सेक्स अन् लव्ह बाइट्स… खासगी आयुष्याबद्दल विजय देवरकोंडाचे धक्कादायक खुलासे
विजय देवरकोंडानं या कार्यक्रमाची सुरुवातच मराठी बोलून केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओच्या सुरुवातीला विजय देवरकोंडा म्हणतो, “नमस्कार मुंबई, कसे आहात तुम्ही सगळे…” विजय देवरकोंडाला मुंबईमध्ये मराठी बोलताना पाहून त्याचे चाहते देखील खूश झाले आहेत. दाक्षिणात्य उच्चारांची झाक असलेला विजयचं मराठमोळा अंदाज चाहत्यांना खूपच भावला आहे. त्याच्या या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
दरम्यान विजय देवरकोंडासोबत ‘लायगर’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात, रम्या कृष्णन, माइक टायसन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन जगन्नाथ पूरी यांनी केलं असून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.