दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा सध्या त्याच्या आगामी ‘VD 12’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज त्याच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होणार आहे. विजय देवरकोंडाचा ‘VD 12’ हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या तिन्ही भाषेतील टीझर आज प्रदर्शित होणार असून यासाठी मनोरंजन विश्वातील विविध तीन कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे.
विजय देवरकोंडाने टीझर प्रदर्शित होण्यापूर्वी या तिन्ही कलाकारांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत. ‘VD 12’ या चित्रपटाच्या हिंदी भाषेतील टीझरला बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने आवाज दिला आहे. त्यामुळे विजय देवरकोंडाने रणबीरचा ‘ॲनिमल’ चित्रपटातील फोटो पोस्ट करत त्याचे आभार मानले आहेत.
एक्स (ट्विटर) अकाउंटवर पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे, “रणबीर कपूर माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक आहे. मी त्याला माझ्या चित्रपटाच्या टीझरला आवाज देण्यासाठी सांगितलं होतं. मात्र, मी त्याला हे सांगताना माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने स्वत:हून यासाठी पुढाकार घेतला. तो म्हणाला, निश्चिंत राहा, मी तुझा टीझर बनवणार आहे, त्यामुळे धन्यवाद आरके.”
हेही वाचा
विजय देवरकोंडाच्या ‘VD 12’ या चित्रपटाच्या तेलुगू भाषेतील टीझरला दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआरने आवाज दिला आहे. विजयने त्याचेही आभार व्यक्त केलेत. त्यासाठी त्याने पोस्टमध्ये लिहिलं, “काल बराच वेळ मी त्याच्याबरोबर होतो. आयुष्य, वेळ आणि चित्रपट यांवर आम्ही गप्पा मारल्या. तसेच याच विषयावर भरपूर हसलोही. टीझरचं डबिंग केलं, टीझरसाठी डबिंग करताना मी जितका उत्सुक होतो तितकाच तोही होता. कालच्या सुंदर दिवसासाठी अण्णा खूप खूप धन्यवाद.”
‘VD 12’ या चित्रपटाच्या तामिळ भाषेतील टीझरला अभिनेता सूर्याने आवाज दिला आहे. त्याचे आभार व्यक्त करत विजयने लिहिलं, “सूर्या अण्णासाठी माझ्या मनात किती आदर आणि प्रेम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून त्याचा चाहता आहे. जितकं मी त्याला ओळखतो, त्यानुसार मला त्यामध्ये सर्वात उत्तम अभिनेत्याची छटा पहायला मिळते. तो एक शांत आणि बुद्धिमान व्यक्ती आहे. मला माहिती होतं की तो मला टीझरला आवाज देण्यासाठी नकार देणार नाही, त्यामुळे मी स्वत:च त्याला काही मागितलं तर नाही म्हण असं सांगितलं होतं. मात्र, त्याने टीझरसाठी आवाज दिलाच.”
विजय देवरकोंडाच्या बहुचर्चित ‘VD 12’ या चित्रपटाचा टीझर आज (१२ फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजून ६ मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे. चाहते आता हा टीझर पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. या चित्रपटात त्याच्यासह रश्मिका मंदाना, श्रीलीला, केशव दीपक यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.