साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट मनोरंजन विश्वात सुरुवातीपासूनच चांगला दबदबा निर्माण करण्यात यशस्वी ठरला होता. गेले अनेक महिने विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. देशातल्या विविध शहरात फिरून त्यांनी या चित्रपटाचे प्रमोशन केले होते. परंतु इतके सगळे करूनही निर्माते आणि प्रेक्षक यांच्या अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट यशस्वी झाला नाही. सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत असताना, आयएमडीबी साईटवर सर्वात कमी रेटिंग्स मिळालेला चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा : हृतिक रोशनला बॉयकॉटची भीती ? चाहत्याच्या पडला पाया
‘लायगर’ हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. आता, ‘आयएमडीबी’ने त्यांच्या साईटवर प्रेक्षकांनी सर्वात कमी रेटिंग्स केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत विजय देवरकोंडाच्या लायगर या चित्रपटाला सर्वात कमी रेटिंग्स मिळाल्याचे दिसत आहे. ‘आयएमडीबी’च्या मते, या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी ‘लायगर’ हा सर्वात कमी रेटिंग असलेला भारतीय चित्रपट आहे.
या यादीत आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला १० पैकी ५, अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ला १० पैकी ४.६, तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ या चित्रपटाला १० पैकी २.९ आणि रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ला १० पैकी ४.९ रेटिंग मिळाले आहेत. या सर्वांमध्ये ‘आयएमडीबी’ने ‘लायगर’ ला १० पैकी फक्त १.९ रेटिंग दिले आहेत. कारण या चित्रपटाने ‘आयएमडीबी’ साईटवर आतापर्यंत फक्त १० हजार ५३० मते गोळा केली आहेत. परंतु, ‘लायगर’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन फक्त ३ दिवस झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात ‘लायगर’ चित्रपटाचे रेटिंग्स सुधारू शकतील असे दिसत आहे.
आणखी वाचा : ‘लायगर’ चित्रपटासाठी कलाकारांनी घेतले ‘इतके’ मानधन.. जाणून घ्या कोणी आकारले किती कोटी
या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाध यांनी केले आहे. तर अभिनेता विजय देवरकोंडाने या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. विजय देवरकोंडाबरोबर अनन्या पांडे आणि रम्या कृष्णन, राजीव रॉय, मकरंद देशपांडे या कलाकारांनी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. या चित्रपटातून प्रसिद्ध अमेरिकन बॉक्सर माईक टायसनचे भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण देखील होते. त्याचा या चित्रपटात कॅमिओ आहे.