बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या ‘लायगर’ (Liger) चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अनन्या आणि विजय बरेच दिवस या चित्रपटाचं संपूर्ण देशभरात जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दोघंही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेलंगणाला देखील पोहोचले होते. पण सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेला बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपट चालणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘लायगर’ चित्रपटाचा ट्रेलर, विजय देवरकोंडाचा लूक पाहून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. पण बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपटाला आर्थिक नुकसान तर सहन करावं लागणार नाही ना अशी भीती या चित्रपटाच्या निर्मात्यांना सतावत आहे. म्हणूनच चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
‘लायगर’ येत्या २६ ऑगस्टला देशभरात प्रदर्शित होणार होता. मात्र आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखच बदलण्यात आली. एनडीटीव्ही इंडियाच्या वृत्तानुसार, २५ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ‘लायगर’चे फक्त रात्रीचे शो चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळतील. २६ ऑगस्टपासून चित्रपटाचे सगळे शो सुरु होतील. बॉयकॉट ट्रेंडमुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे.
आणखी वाचा – Video : पारंपरिक साडी, केसात गजरा, मराठमोळा थाट अन्…; पंकजा मुंडे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत, पाहा व्हिडीओ
दरम्यान अनन्या आणि विजय देवरकोंडा यांची मुख्य भूमिका असलेला ‘लायगर’ चित्रपट इतर भाषांमध्ये ही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त कन्नड, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्येही प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केलं असून निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे.