गेल्या अनेक महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांच्या विरोधात ‘बॉयकॉट’ ट्रेंड होत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटल्यानंतर शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर सुरू होती. आता दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करण्यात येत आहे. काही नेटकऱ्यांनी #BoycottLiger असा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु केला आहे. नुकतंच विजय देवरकोंडाने या ट्रोलिंगवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
विजय देवरकोंडा हा सध्या त्याचा आगामी लाइगर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासोबतच अभिनेत्री अनन्या पांडे ही स्क्रीन शेअर करणार आहे. ते दोघेही गेल्या काही दिवसांपासून विविध ठिकाणी लाइगरचे प्रमोशन करताना दिसत आहेत. या दोघांनी नुकतंच एका मुलाखत दिली. त्यावेळी विजय देवरकोंडाला ट्रोलिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “आपण याकडे जास्तच लक्ष देत आहोत, असे मला वाटतं.” तर अनन्या पांडे म्हणाली की, ‘नेटकरी रोज काही ना काही गोष्टींवर बहिष्कार टाकतच असतात.’
यापुढे विजय देवरकोंडा म्हणाला, “हा, होऊ दे. आपण काय करु शकतो. आपण एखादा चांगला चित्रपट बनवू, जर त्यांना तो बघायचा असेल तर ते बघतील. ज्यांना तो चित्रपट बघण्याची इच्छा नसेल ते तो टीव्हीवर किंवा फोनवर पाहतील. आम्ही काहीही करु शकत नाही.” विजय देवरकोंडाच्या या वक्तव्यानंतर अनेक लोकांना राग अनावर झाला होता. त्यानंतर अनेकांनी लाइगर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. अनेकांनी ट्विटरवर #BoycottLiger असा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरु केला होता.
नुकतंच या सर्व प्रकरणावर विजय देवरकोंडाने ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्याने तेलुगू भाषेत एक ट्वीट करत याप्रकरणावर भाष्य केले आहे. यात तो म्हणाला, “जर आपण बरोबर असू आणि आपला धर्म करत असू तर आपल्याला कोणाचं ऐकण्याची गरज नाही. चला लढूया.”
दरम्यान विजय देवरकोंडाचा लाइगर चित्रपट येत्या २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटातून विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट असून यात विजय देवरकोंडा मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटरच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये विजय आणि अनन्याशिवाय रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि मकरंद देशपांडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.