तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. त्याचा हा पहिला पॅन इंडिया चित्रपट होता. ‘लायगर’आधी प्रदर्शित झालेल्या त्यांच्या तीन चित्रपटांना अपयश मिळाले होते. त्यामुळे या चित्रपटाकडून त्याला आणि त्याच्या चाहत्यांना फार अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या विधानांमुळे तो फार चर्चेत आला होता. चित्रपटाने अपेक्षाभंग केल्याने लोक त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करु लागले होते. सततच्या ट्रोलिंगमुळे त्याने सोशल मीडियापासून काही काळ लांब राहायचे असे ठरवले.
नुकत्याच पार पडलेल्या SIIMA च्या पुरस्कार सोहळ्याला विजय देवरकोंडा उपस्थित होता. या सोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यादरम्यान त्याने पहिल्यांदा ‘लायगर’ला मिळालेल्या अपयशावर त्यांची बाजू मांडली. त्याला पुरस्कार घेण्यासाठी मंचावर बोलवण्यात आले. पुरस्कार घेतल्यानंतर विजयने अस्वस्थतेमुळे या कार्यक्रमामध्ये यायची इच्छा नसल्याचा खुलासा केला.
‘लायगर’च्या अपयशावर भाष्य करत तो म्हणाला, “काही दिवस चांगले असतात, काही दिवस चांगले नसतात. तर काही दिवस फार त्रासदायक असतात. या दिवसांची पर्वा न करता आपण दररोज उठतो, कामाला लागतो… आणि खरं सांगायचं तर हा पुरस्कार घेण्यासाठी इथे येण्याची मला इच्छा नव्हती, पण तरीही मी आलो आणि तुमच्याशी बोलतोय. मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागेन, तुमचे मनोरंजन करण्यासाठी सतत मेहनत करेन. रसिकांसाठी चांगल्या चित्रपट घेऊन येईन हे वचन मी आज तुम्हा सर्वांना देतो.” त्यांच्या या छोट्या, पण दमदार भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत त्याला पाठिंबा दिला आहे.
विजयने चित्रपटांपासून काही दिवसांचा ब्रेक घेतला आहे. तो सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. दरम्यान याच वेळी रश्मिका मंदाना देखील मालदीवमध्ये असल्यामुळे ते दोघे एकत्र असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोशल मीडियावर ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.