साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री समंथा प्रभू यांचा ‘खुशी’ चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. दरम्यान बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे विजय देवरकोंडा खूप खूष आहे. आता तो त्याच्या चाहत्यांसोबत त्याचा आनंद साजरा करणार आहे. त्याने त्याच्या फीमधून एक कोटी रुपये चाहत्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय देवराकोंडाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विशाखापट्टणममधील ‘खुशी’च्या प्रमोशन इव्हेंटचा आहे. व्हिडिओमध्ये विजय खुशी चित्रपटाला मिळणारे यश साजरे करण्यासाठी आपल्या चाहत्यांना १ कोटी रुपये दान करणार असल्याचे म्हणताना दिसत आहे.
विजय देवरकोंडा म्हणाला की, तो ऑनलाइन फॉर्मद्वारे १०० कुटुंबांची निवड करेल आणि प्रत्येक कुटुंबाला १ लाख रुपये देणार आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये विजय म्हणताना दिसत आहे. तुम्ही आनंदी आहात म्हणून मीही आनंदी आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी, मी काहीतरी करण्याचा विचार करत आहे आणि ते योग्य की अयोग्य हे मला माहित नाही. जर मी हे केले नाही तर मी झोपू शकणार नाही. माझ्या कमाईतील एक कोटी रुपये मी आनंदाने देईन.”
हेही वाचा- ‘या’ दिवशी येणार ‘थँक यू फॉर कमिंग’चा ट्रेलर; भूमी पेडणेकरचा जबरदस्त बोल्ड अंदाज चर्चेत
शिव निर्वाण यांनी दिग्दर्शन केलेल्या खुशी चित्रपटात विजय देवरकोंडाबरोबर अभिनेत्री समंथा प्रभू प्रमुख भूमिकेत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने ७०.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. विजय देवरकोंडाचा यापूर्वीचा चित्रपट ‘लायगर’ आणि समंथाचा ‘शकुंतलम’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आता खुशी चित्रपटाला मिळणाऱ्या यशानंतर दोघेही खूप आनंदी असल्याचे दिसून येत आहे.