दाक्षिणात्य चित्रपटांचा सुपरस्टार मानला जाणारा विजय देवराकोंडा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला मात्र प्रेक्षकांमधील त्याची लोकप्रियता अद्याप कायम आहे. त्याच्या लव्ह लाइफपासून ते करिअरपर्यंत सर्वच गोष्टी नेहमी चर्चेचा विषय ठरतात. यापूर्वी विजय दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण आता विजयने दुसऱ्याच एका दाक्षिणात्य अभिनेत्रीवर प्रेम व्यक्त करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.
तेलुगू सुपरस्टार विजय देवरकोंडाचं नाव रश्मिका मंदानाशी मागच्या बऱ्याच काळापासून जोडलं जात आहे. दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. पण आता या दोघांच्या लव्हस्टोरीत ट्विस्ट आला आहे. विजय देवरकोंडाने नुकतंच एक असे ट्विट केलं आहे ज्यात त्याने त्याच्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. या ट्विटमध्ये विजयने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं ‘प्रेम’ असं वर्णन केलं आहे. अभिनेत्याचं हे ट्वीट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
आणखी वाचा- “आम्ही फार जवळ…” विजय देवरकोंडाशी असलेल्या नात्याबद्दल रश्मिका मंदानाचे स्पष्ट उत्तर
विजय देवरकोंडाने आपल्या ट्वीटमध्ये उल्लेख केलेली दाक्षिणात्य अभिनेत्री दुसरी कोणी नसून समांथा रुथ प्रभू आहे. लाखो-करोडो लोकांना आपल्या अभिनयाने वेड लावणाऱ्या समांथाच्या चाहत्यांच्या यादीत विजय देवरकोंडाचे नाव आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट ‘यशोदा’ चं पोस्टर शेअर करताना विजयने लिहिलं, “ज्या दिवशी मी तिला मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं त्याच दिवशी मी तिच्या प्रेमात पडलो. त्यावेळी मी कॉलेजमधील मुलगा होतो. आज मी तिच्या प्रत्येक गोष्टीसाठी तिचं कौतुक करतो.” नुकताच समांथाच्या ‘यशोदा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा- ‘लायगर’ फ्लॉप झाल्याने दिग्दर्शकाला येत आहेत जीवे मारण्याच्या धमक्या; पोलिसांत दाखल केली तक्रार
दरम्यान विजय देवरकोंडा लवकरच समांथा रुथ प्रभूसह मोठ्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. दोघेही ‘खुशी’ या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण काश्मीरमध्ये झालं आहे. येत्या २३ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.