आजच्या नव्या पिढीतील रंगकर्मीकडे कल्पनाशक्ती असून त्यांना जीवनमूल्यांची जाणीवही आहे. या नव्या पिढीतील रंगकर्मीनी नाटक हा साहित्य प्रकार आहे, याची जाणीव ठेवावी. तसे ते ठेवले तर उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती होऊ शकेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे यांनी नुकतेच मुंबईत केले.
चतुरंग प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या ‘निमित्त संध्या’ कार्यक्रमात केंकरे ‘नाटक- कालचे, आजचे आणि लंडनचे’ या विषयावरील चर्चेत बोलत होते. या चर्चेत केंकरे यांच्यासह दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, केदार शिंदे, सुनील बर्वे, चंद्रकांत कुलकर्णी हे सहभागी झाले होते.
गाजलेली जुनी नाटके न करता काही खास अशी नाटके नव्या स्वरूपात ‘हर्बेरियम’ उपक्रमात सादर केली. त्यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नव्हता, असे सुनील बर्वे यांनी सांगितले. तर प्रतिमा कुलकर्णी म्हणाल्या, आजचा तरुण रंगकर्मी जे दिसते, जाणवते, तेच सादर करू पाहतो आणि त्यांचा हा निकोप दृष्टिकोन आपल्याला भावला. चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले, आजही समांतर रंगभूमीवर अनेक उत्तम संहिता सादर केल्या जातात. यातून एक वेगळी लेखनशैली, आकृतिबंध आणि वैचारिक स्पष्टता जाणवते. जागा, जाहिरात आणि आर्थिक पाठबळ नसल्याने ही नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाहीत.
केदार शिंदे यांनी आपल्या आजोबांचे म्हणजेच शाहीर साबळे यांचे ‘आंधळं दळतंय’ हे लोकनाटय़ दिग्दर्शित करताना यात आजोबांनी रंगविलेला ‘झुंजारराव पाटील’ ही भूमिका आपण का केली व ती करताना आपण त्यात कसे रंगून जायचो, याची आठवण सांगितली.
व्यक्त होण्याचा स्वातंत्र्याचा हक्क जसा रंगकर्मीनी जबाबदारीने हाताळायला हवा, तसेच प्रेक्षक आणि माध्यमांनीही आपली जबाबदारी ओळखून प्रसंगी रंगकर्मीच्या पाठीशी उभे राहावे. तरच उत्तम नाटके सादर होतील, असे मतही या वेळी व्यक्त करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा