अभिनेता शाहरूख खानच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. हा चित्रपट एक ब्लॉकबस्टर चित्रपट ठरेल असे चित्रपटप्रेमींना वाटत आहे, कारण फक्त शाहरुखच नाही तर या चित्रपटात तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती एका जबरदस्त भूमिकेत झळकणार आहे. शिवाय सुप्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासुद्धा एक महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात साकारत आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण सध्या या चित्रपटाच्या वेगळ्याच गोष्टीबद्दल चर्चा होत आहे. विजय सेतुपतीने या चित्रपटासाठी घेतलेले मानधन हा या चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा : “महिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” नवाजुद्दीन सिद्दीकीने सांगितला स्त्री पात्र साकारण्याचा अनुभव

विजयने या चित्रपटासाठी तगडी रक्कम आकारली आहे. याआधी कोणत्याही चित्रपटासाठी त्याने इतके मानधन घेतलेले नाही. ‘पिंकविला’चा अहवालानुसार, विजयने ‘जवान’ या चित्रपटात काम करण्यासाठी २१ कोटी मानधन घेतलं आहे. याआधीच्या चित्रपटासाठी विजयने १५ कोटी मानधन घेतलं होतं.

विजय सेतुपतीचे वाढण्यामागे एक मोठं कारण आहे. काही महिन्यांआधी रिलीज झालेल्या कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटातील विजयच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. त्यामुळे तो आपल्या चित्रपटात असावा असे अनेक निर्मात्यांना वाटू लागले. ‘जवान’साठी विजयने अन्य दोन चित्रपट सोडले. यामुळेही त्याचं मानधन वाढलं. ‘जवान’ मध्ये विजयची भूमिका इतकी महत्त्वपूर्ण आहे की, तो या चित्रपटाला नकार देऊ शकला नाही. विजय या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी ‘जवान’च्या निर्मात्यांनी सुरुवातीला ‘बाहुबली’ फेम राणा दग्गुबतीशी संपर्क साधला होता. मात्र तारखा मिळत नसल्याने त्याने या भूमिकेला नकार दिला. त्यानंतर शाहरूखने स्वतः या चित्रपटाबद्दल विजय सेतुपतीसोबत चर्चा केली आणि त्याचा होकार मिळवला.

आणखी वाचा : विजय सेतुपतीच्या मुलीला बलात्काराची धमकी; मुरलीधरनच्या बायोपिकमध्ये करणार होता काम

‘जवान’ हा सिनेमा हिंदीशिवाय तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. या अॅक्शन चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, राणा डुग्गुबाती आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकारही पाहायला मिळणार आहेत. शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा रेड चिलीज एंटरटेनमेंटने २२ जून रोजी केली होती. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.