मराठीतील सर्वोत्तम साहित्य आणि मराठी मालिका असा योग क्वचितच जुळून येतो. तसा तो योग आता ‘ई’ टीव्ही मराठीने जुळवून आणला आहे. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ या गाजलेल्या नाटकावर आधारित मालिका लवकरच ई टीव्ही मराठीवर दाखल होणार आहे.
नेहमीच्या कौटुंबिक मालिकांपेक्षा वेगळ्या विषयावरच्या मालिकांची संख्या टीव्हीवर तुरळकच आहे. मानवी तस्करीसारख्या गंभीर विषयाला थेट हात घालणारे आणि नव्वदच्या दशकात गाजलेले लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ या नाटकावर आधारित त्याच नावाची मालिका ‘ई’ टीव्ही वाहिनीवर येत आहे. गावांमधून होणाऱ्या मानवी तस्करीबाबत माहिती गोळा करण्यासाठी दिल्लीतील पत्रकार जयसिंग स्वत: या बाजारातून कमला नामक एका तरुणीला विकत घेतो आणि त्यानंतर तो आणि त्याची बायको सरिता या विळख्यात भावनिकरीत्या कसे गुंतले जातात, यावर हे नाटक बेतले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना वाहिनीच्या फिक्शन हेड अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले की, ‘‘‘ई’ टीव्ही मराठीवर दरवेळी काहीतरी वेगळे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मराठी साहित्यातील एखाद्या अजरामर कलाकृतीवरून मालिकेची निर्मिती करण्याचा विचार आमच्या मनात आला. तेव्हा तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकावर मालिका करायचे असे आम्ही ठरवले.’’ तब्बल वीस वर्ष जुन्या नाटकावर मालिका बनवण्याचा विचार करताना हा विषय आजच्या काळालाही साजेसा असल्याचे अपर्णा सांगतात. ‘तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकामध्ये मांडलेले मुद्दे आणि विषय यांना काळाचे बंधन नाही. ‘कमला’मध्ये मांडला गेलेला मानवी तस्करीचा विषय आजही तितकाच गंभीर आहे. पण, त्याचबरोबर माणसाचे होणारे व्यापारीकरण हा या नाटकाचा मूळ विषय आहे. आपल्या फायद्यासाठी नाटकाचा नायक कमलाचा एक वस्तू म्हणून वापर करतो. पण, त्याच वेळी नाटकाच्या पुढच्या वळणावर तो आणि त्याची पत्नी सरितासुद्धा या व्यापारीकरणाचा एक भाग होऊन जातात.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा