मुंबई मराठी साहित्य संघ आणि धि गोवा हिंदूू असोसिएशन या दोन संस्था म्हणजे माझे माहेर आहे. माझ्या आजवरच्या जीवन आणि नाटय़ प्रवासात या दोन्ही संस्था माझ्यामागे भक्कमपणे उभ्या राहिल्या. जीवनातील प्रत्येक महत्वाच्या क्षणी मला या संस्थांचा पाठिंबा मिळाला आणि आजही मिळतो आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी मंगळवारी मुंबईत गिरगाव येथे केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि धि गोवा हिंदूू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या दामू केंकरे स्मृती नाटय़ोत्सवाचे उद्घाटन मेहता यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्या बोलत होत्या. या वेळी धि गोवा हिंदूू असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पै-काकोडे, मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाटय़ निर्माते प्रसाद कांबळी, अनंत पणशीकर, दामू केंकरे यांच्या पत्नी ललिता केंकरे उपस्थित होते.
आमच्या पिढीने नाटक हे सर्वस्व मानून आम्ही स्वत:ला त्यात झोकून दिले. आत्ताची तरुण पिढी हुशार आणि व्यावहारिक आहे. त्यांना पैसा व प्रसिद्धीची गणिते माहिती असल्याचेही विजया मेहता यांनी सांगितले. दामू केंकरे हा आपला जीवलग मित्र होता. आयुष्यातील महत्वाच्या प्रसंगी तो माझ्यापाठी सदैव उभा राहिला असे सांगत विजया मेहता यांनी मुंबई मराठी साहित्य संघातून सुरु झालेला आपला नाटय़प्रवास, विल्सन महाविद्यालयातील नाटकाच्या तालमी, ‘अजब न्याय वर्तुळाचा’ हे नाटक, जर्मन कलाकारांसोबत केलेले काम याच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक उषा तांबे व सूत्रसंचालन गणेश आचवल यांनी केले. नाटय़ोत्सवाबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी दिली. साहित्य संघाच्या नाटय़ शाखेचे कार्यवाह सुभाष भागवत यांनी आभार मानले. ‘अविष्कार’निर्मित ‘आयदान’ हा नाटय़प्रयोग सादर झाला. हा महोत्सव १० मे पर्यंत सुरु राहणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

Story img Loader