बिग बॉसच्या या सिझनमध्ये सध्या अनेक नवीन गोष्टी घडत आहेत. शोमध्ये विकास गुप्ताने पुन्हा एकदा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास तुरुंगात बंद होता तेव्हा शिल्पा तिथे आली आणि तिने विकासला अनेक गोष्टी सुनावल्या. शिल्पासोबत होत असलेल्या वादाला कंटाळून शेवटी त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय केला. घरातून पळतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लक्झरी बजेट टास्कमध्ये सर्वात वाईट काम केल्यामुळे घरातील इतर स्पर्धकांनी मिळून विकासला तुरुंगात टाकले होते. तुरुंगात त्याआधी आर्शी आणि मेहजबीन होत्याच. यापुढे तुरुंगात जाणाऱ्या स्पर्धकाला तिथे राहणे कठीण होणार आहे. कारण यापुढे त्यांना फक्त दोन वेळचे जेवण मिळणार आहे. घरातल्यांनी एकत्रित येत वाईट कामगिरीबद्दल आपले नाव पुढे केल्यामुळे विकास आधीच रागात होता. त्यात शिल्पाने येऊन त्याला चिथवल्यामुळे त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

आर्शी आणि मेहजबीने त्याला तुरुंगातून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला. पण विकासने त्याचा निर्णय पक्का असल्याचे सांगितले. तो तुरुंगातील एका फटीतून बाहेर पडला. बिग बॉसने विकासला त्याच्या या कृतीबद्दल खूप सुनावले. बिझनेस ऑफ सिनेमाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, घराचा एक दरवाजा उघडा पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. बिग बॉसने त्याला कनफेशन रुममध्ये बोलावून घेतले असता आपला निर्णय अंतिम असल्याचे त्याने म्हटले. तसेच करार अर्ध्यावर तोडत असल्यामुळे त्याने २ कोटी रुपयाचा दंड भरण्यासही संमती दर्शवली.

लक्झरी बजेट टास्कवेळी विकास आणि शिल्पा यांच्या दोन टीम केल्या होत्या. या टास्कमध्ये विकासची टीम जिंकल्याचे समजते. ‘बिग बॉस’ने विकासला एक तर टास्कमध्ये विजय मिळव किंवा कॅप्टनसी घे असे सांगितले होते. पण इतर सदस्यांनी बेनाफशाहची कॅप्टन म्हणून निवड केली. विकासला त्याच्यासोबत केलेला दुजाभाव अजिबात आवडला नाही. हे कमी होतं की काय म्हणून प्रियांक शर्मानेही त्याची साथ सोडली. टास्कमध्ये सर्वात वाईट प्रदर्शन कोणाचे होते, असे विचारले असता हिनाने सर्वात आधी विकासचेच नाव घेतले होते.

Story img Loader