मुस्लीम बांधवांसाठी रमजान आणि रमजान ईद हे अत्यंत खास आणि महत्त्वाचे असतात. रमजानच्या महिन्यात पाण्याचा एकही घोट न पिता संपूर्ण दिवस हे बांधव कडक उपवास करतात, त्यामुळे हे दिवस त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. तसंच त्यांच्यासाठी रमजान ईददेखील तितकीच महत्त्वाची आहे. या दिवशी प्रत्येक मुस्लीम बांधव एकत्र येऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात. तसंच हा दिवस मोठ्या थाटात साजरा करतात. सर्वत्र दिव्यांची रोषणाई करत ते एकमेकांना घरी जेवायला बोलावतात. मात्र यंदा देशात लॉकडाउन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांना ईद साजरी करता आली नाही. मात्र ईद साजरी करता न आलेल्या जवळपास २ लाख बांधावांना अन्नधान्य पूरवत शेफ विकास खन्नाने त्यांची ईद खास करण्याचा प्रयत्न केला.

विकासने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. विकास सध्या लॉकडाउन असल्यामुळे अमेरिकेत अडकला आहे. मात्र तिथे असूनही त्याने देशातील जनतेचा विचार केला. दूर असूनही त्याने देशातील मुस्लीम बांधवांची ईद खास केली. विकासने गरजुंमध्ये अन्यधान्य आणि काही जीवनावश्यक वस्तूंचा वाटप केलं. याविषयी एक पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

“जगातील सर्वात मोठा ईद फेस्टिव्हल. मुंबईत २ लाख लोकांमध्ये अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं”, असं कॅप्शन देत विकासने पोस्ट शेअर केली. तसंच त्याने अन्य ७५ शहरांमध्येही अन्नधान्याचं वाटप केलं आहे. यात तांदूळ, फळे, मसाले, स्वयंपाक घरात लागणाऱ्या वस्तू, चहा, मीठ आणि फळांचा रस यांचा समावेश आहे.  विकास खन्नाप्रमाणेच कलाविश्वातील अनेक जण गरजुंची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader