Vikas Sethi Passes Away: २००० च्या दशकात टीव्हीवरील प्रसिद्ध हिंदी मालिकांमधून अभिनय केलेल्या विकास सेठी या अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४८ व्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ अशा प्रसिद्ध मालिकांतून विकास सेठीने अभिनय केला होता. तीन वर्षांपूर्वी त्याला वयाच्या ४५ व्या वर्षी जुळी मुले झाली होती. त्यांचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत नव्या आयुष्याची सुरूवात करत असल्याचे म्हटले होते. मात्र दुर्दैवाने ८ सप्टेंबर रोजी रविवारी झोपेत असतानाच त्याचा मृत्यू झाला.
विकास सेठीच्या कुटुंबियांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वरील तीन मालिकांशिवाय विकास सेठीने इतर अनेक मालिकांमध्ये छोटे छोटे पात्र साकारले होते. नच बलीये या डान्सिंग रिॲलिटी शोच्या तिसऱ्या पर्वात त्याने आपल्या पत्नीसह सहभाग घेतला होता. याशिवाय कभी खुशी, कभी गम या चित्रपटातही विकास सेठीने काम केले होते. करीना कपूरचा मित्र ‘रॉबी’ हे पात्र त्याने साकारले होते. जे त्यावेळी चांगलेच लोकप्रिय झाले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून विकास सेठी आर्थिक समस्यांशी झगडत होता. बरेच दिवस त्याच्याकडे काहीच काम नव्हते. सिनेसृष्टीतील अनेक मित्रांच्या संपर्कातही तो नव्हता, असे सांगितले जाते.
२०१८ साली विकासने जान्हवी सेठीशी लग्न केले होते. लग्नानंतर २०२२ साली दोघांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला होता. सोशल मीडियावर विकास सेठी बराच सक्रिय असायचा. आपल्या कुटुंबियासह काढलेले फोटो आणि व्हिडीओ विकासकडून पोस्ट केले जात असत. पण मागच्या चार महिन्यांपासून तो सोशल मीडियावरही दिसला नाही.
याशिवाय २००१ साली दिवानापन या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि दिया मिर्झा यांच्यासह विकास सेठीने काम केले होते. तसेच २०१९ साली त्याने प्रसिद्ध तेलगू चित्रपट आयस्मार्ट शंकरमध्ये काम केले होते. २००३ साली दीपक तिजोरी यांनी निर्मिती केलेल्या उप्स या चित्रपटात विकास सेठीने मुख्य मात्र साकारले होते. मात्र या चित्रपटाला उत्तेजक आणि अश्लील म्हणून हिणवले गेले होते. तसेच चित्रपटाच्या विरोधात निदर्शनेही झाली होती. त्यामुळे विकास सेठी काही काळ वादात अडकला होता.