बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरु आहे. या ट्रेण्डच्या ओघामध्ये क्रीडापटू, राजकारणी, अभिनेता यांसारख्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातच आता पीएम नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी कलाविश्वात आलेल्या बायोपिकच्या ट्रेण्डविषयी आपलं मत मांडलं आहे. लेखिका अर्चना धुरंधर यांच्या ‘द सोल चार्जर’ या पुस्तकाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

“बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड असल्यामुळे आतापर्यंत अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे चित्रपटांच्या यादीमध्ये बायोपिकची गर्दी झाली आहे.मात्र कालांतराने प्रेक्षकवर्ग या साऱ्याला कंटाळणार आहे. ज्यावेळी एखादा बायोपिक अयशस्वी ठरेल तेव्हा या बायोपिकची निर्मिती थांबेल”, असं विक्रम भट्ट म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, “इतर चित्रपटांच्या निर्मितीपेक्षा बायोपिकची निर्मिती वेगळी असते. बायोपिक करताना चित्रपटाचं कथानक आगोदरपासूनच तयार असतं. ते फक्त पडद्यावर उतरवायचं असतं. गेल्या २६-२७ वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये चित्रपटांचं दिग्दर्शन करत आहे. करिअरचे १० वर्ष मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यामुळे या कारकिर्दीमध्ये मी असे अनेक ट्रेण्ड्स पाहिले आहेत. ठराविक काळानंतर हा ट्रेण्ड मागे पडतो आणि नवीन ट्रेण्ड सुरु होतो. एक बायोपिक यशस्वी ठरल्यानंतर अनेक बायोपिकची निर्मिती होते”.

दरम्यान, जर आता एखादा कॉमेडी चित्रपट बॉक्सऑफिसवर गाजला तर बॉलिवूडमध्ये सलग अशाच धर्तीच्या चित्रपटांची निर्मिती होते. मात्र यातले १-२ चित्रपट अपयशी ठरले तर हा ट्रेण्ड मागे पडतो, असंही ते म्हणाले. विक्रम भट्ट यांनी ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ (२००२) ,’आवारा पागल दीवाना’ (२००२), ‘कसूर’ (२००१), ‘गुलाम’ (१९९८) ,’फरेब’ (१९९६), ‘गुनहगार’ (१९९५), ‘जानम’ (१९९२) या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

 

Story img Loader