‘जसे आपण बिमल रॉय, राज कपूरचे चित्रपट पाहतो, तसे राजा परांजपे यांचे चित्रपट पाहणे व अभ्यासणे हे प्रत्येक नव्या मराठी दिग्दर्शकाचे कर्तव्य आहे,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महोत्सवात गोखले यांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ‘राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. प्रतिष्ठानच्या अर्चना राणे, अजय राणे, भारत देसडला या वेळी उपस्थित होते.
‘अभ्यासासाठी मी जसा हिचकॉक जमा करतो तसे राजाभाऊ देखील मला जमा करायला हवेत. त्या वेळी तंत्र जुने होते, कृष्णधवल चित्रपटांचा जमाना होता. परंतु चित्रपटनिर्मितीमागे असलेला हेतू खूप महत्त्वाचा असतो. राजाभाऊ हे सुशिक्षित, सुविद्य, समृद्ध जाणिवेचे व उत्कृष्ट लिहिणारे दिग्दर्शक व नट होते. विजया मेहता मला आदरणीय आहेत. परंतु ही मंडळी फारच मोठी, मेहता यांच्यापेक्षाही मोठी होती. नाटय़, अभिनय, दिग्दर्शनाचे कोणतेही प्रशिक्षण उपलब्ध नसताना परांजपे ज्या प्रकारे हेतूपूर्ण चित्रपट बनवत होते त्याला तोड नाही,’ असे गोखले यांनी सांगितले. आपण ७-८ वर्षांचे असताना राजाभाऊंच्या दिग्दर्शनात दोन चित्रपटांत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, असे सांगून त्यांनी त्या वेळच्या काही आठवणीही उलगडल्या.
शिंदे म्हणाले, ‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी चित्रपटसृष्टी संगीत बारीकडे वळली व मराठी चित्रपट म्हणजे तमाशापट हे समीकरण तयार झाले. राजाभाऊंच्या कारकिर्दीत मात्र ‘ऊन-पाऊस’, ‘पेडगावचे शहाणे’ असे एकापेक्षा एक चित्रपट आले आणि त्यांनी चित्रपटात नव्या संस्कृतीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. राजा परांजपे, सुधीर फडके, ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी चित्रपटांना तारले.’
‘मेहबूब स्टुडिओच्या दरवानानेच मला हाकलून दिले!’
सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या अभिनयाच्या छंदाच्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘मी नाईट हायस्कूलमध्ये असताना २-३ नाटकात स्त्री पार्टी काम केले. महाविद्यालयात गेल्यानंतर मात्र मला ‘हीरो’च्या भूमिका मिळू लागल्या. मला हरभऱ्याच्या झाडावर बसवण्याचे काम काही मंडळी करत होती. ‘तू राज कपूरसारखा दिसतोस व तुझे भविष्य चित्रपटसृष्टीत आहे,’ असे लोक सांगत. मलाही ते खरेच वाटले आणि मी एके दिवशी मुंबईत मेहबूब स्टुडिओच्या दारी गेलो. परंतु दरवानाने मला तिथूनच हाकलून दिले. परत मी त्या रस्त्याला गेलो नाही, पण नंतर नाटकाचा मुहूर्त करण्यासाठी १०-१२ वेळा मेहबूब स्टुडिओत गेलो.’  

Story img Loader