गेल्या काही वर्षांत मराठी वाहिन्यांवर प्रायोगिक मालिका पाहावयास मिळत आहेत. अशीच एक मालिका आता येणार असून याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेता ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले करणार आहेत. `रात्र वणव्याची’ या ५२ भागांच्या मालिकेचे ते दिग्दर्शन करत आहेत. दूरदर्शनची निर्मिती असलेली ही मालिका सह्याद्री वाहिनीवर दाखविण्यात येईल.
`रात्र वणव्याची’ ही मालिका राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या कादंबरीवर आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये योग्य स्थान मिळविण्यासाठी लढा देणा-या स्त्रीवर ही मालिका आधारित आहे. प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत येणारे अनुभव आणि सर्वच पातळ्यांवर येणा-या समस्यांना मालिकेची मुख्य नायिका कशी मात करते हे या मालिकेत पाहावयास मिळेल. नाटक आणि चित्रपटात काम करणा-या अभिनेत्री कांचन जाधव यात प्रमुख भूमिकेत दिसतील.
सदर मालिकेच्या प्रत्येक भागाचा निर्मिती खर्च हा जवळपास दोन लाख रुपये असणार आहे. `रात्र वणव्याची’चे चित्रीकरण पुण्यात करण्यात येणार असून, १५ ऑगस्टपासून ही मालिका सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी दिली.

Story img Loader