actor vikram : दाक्षिणात्य सिनेमांत वेगळ्या आणि हटके भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे चियान विक्रम. ‘अनियान’ (अपरिचित) सिनेमात एका मनोरुग्णाची भूमिका, ‘रोबोट’सारख्या सिनेमाचा प्रसिद्ध दिग्दर्शक एस. शंकर यांच्या ‘आय’ सिनेमातील भूमिका ज्यासाठी विक्रमने वजन वाढवून व नंतर वजन कमी करून केलेली भूमिका, ‘पोन्नियन सेल्वन’मधील भूमिका या विक्रमच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. विक्रम सध्या त्याच्या ‘थंगलान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाने १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान विक्रमने बॉम्बे या सिनेमाची एक आठवण सांगितली. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचा ‘बॉम्बे’ सिनेमा त्याच्या हातून निसटला आणि तो दोन महिने रडत होता, असे विक्रम म्हणाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रम सध्या त्याच्या ‘थंगलान’ सिनेमाचे यश साजरे करीत आहे. अलीकडेच विक्रमने दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘बॉम्बे’ सिनेमात मुख्य भूमिका करण्याची संधी कशी हुकली, हा किस्सा सांगितला आहे. सिद्धार्थ कनन या यूट्यूब चॅनेलवर चियान विक्रमने सांगितले की, त्याची सुरुवातीला ‘बॉम्बे’ सिनेमात मुख्य भूमिकेसाठी निवड झाली होती. पण, त्याने ऑडिशनच्या अंतिम टप्प्यात चूक केली आणि अरविंद स्वामीला या चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली.

हेही वाचा…फोटो फाडून रद्दीत फेकायचे…; ‘बिग बॉस’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क, पाहा जबरदस्त प्रोमो

‘बॉम्बे’मधील भूमिकेला नकार दिल्याच्या अफवांबद्दल विचारले असता, विक्रमने स्पष्टीकरण दिले, “मी ‘बॉम्बे’ला नकार दिला नाही. मणीसरांनी मला अचानक ऑडिशन देण्यास सांगितले आणि त्यांना व्हिडीओ कॅमेरा मिळाला नाही. त्यांच्याकडे स्टील कॅमेरा होता. ते मला म्हणाले, “आता अभिनय कर.” त्यांनी मला सांगितलं, “तिथे एक मुलगी आहे. ती धावत आहे. त्या मुलीकडे बघ आणि मी फ्रीझ करेन.” ते म्हणाले, “थांबू नकोस.” विक्रमने पुढे सांगितले, “पण, मी गोंधळलो. ‘त्याच्याकडे कॅमेरा आहे आणि तो व्हिडीओ कॅमेरा नाही; मग मी अभिनय का करू’, असा प्रश्न मला पडला. तेव्हा मला हे समजलं की, जर मी हललो, तर त्यांना अस्पष्ट प्रतिमा मिळेल.”

या गोंधळानंतर विक्रमच्या हातून ‘बॉम्बे’ निसटला. हा चित्रपट गमावल्यानंतर दोन महिने मी खूप रडलो, याची आठवण सांगताना विक्रम म्हणतो, “मणीसरांसोबत काम करणं हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं. या चित्रपटानंतर मी निवृत्त होण्यास तयार होतो. त्यानंतर मला कशाचीही गरज नव्हती. माझं नाव या सिनेमासाठी निश्चित करण्यात आलं होतं. सकाळी मनीषा कोईरालाचं फोटोशूट होतं आणि संध्याकाळी माझं फोटोशूट होतं; पण मी ते खराब केलं. त्यानंतर दोन महिने, दररोज उठून मी रडत असे की, हा सिनेमा मी कसा काय गमावू शकतो. तोही संपूर्ण भारतात चाललेला सिनेमा होता.”

हेही वाचा…मामूटी यांनी अखेर हेमा कमिटीच्या अहवालावर सोडलं मौन; म्हणाले, “आता वेळ आली आहे की…”

विक्रमच्या हातून ‘बॉम्बे’ सिनेमा निसटला जरी असला तरी मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्याचे त्याचे स्वप्न २०१० मध्ये आलेल्या ‘रावणन’ या सिनेमातून पूर्ण झाले. त्यानंतर या जोडीने २०२२ मध्ये आलेल्या ‘पोन्नियन सेल्वन’ आणि २०२३ मध्ये आलेल्या याच सिनेमाच्या पुढील भागात एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram opens up about losing mani ratnam bombay and crying for two months psg