‘विक्रम आणि वेधा’ यांचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाल्यामुळे आर माधवनच्या चाहत्यांना त्याच्या फोटो कलेक्शनसाठी अजून एक पोस्टर मिळाला आहे. विक्रम वेधा या सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये माधवन आणि विजय सेतुपती हे तामिळमधील जेनससारखे वाटतात. जेनस मुर्तीवर जसे दोन चेहरे असतात अगदी त्याप्रमाणे आर. माधवन आणि विजय हे एकाच गोष्टीच्या दोन वेगळ्या बाजू दाखवत आहेत असेच वाटते. या पहिल्या पोस्टरमध्ये दोघांनीही दाढी ठेवलेली आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटोमध्ये दोघांचाही लूक अधिक आकर्षित करणारा आहे. ‘विक्रम वेधा’ या सिनेमात माधवन विक्रमादित्य ही व्यक्तिरेखा साकारत आहे. विक्रमादित्य हा एक एन्काऊंटर स्पेशालिस्ट पोलीस अधिकारी आहे. तर विजय सेतुपती याने कुख्यात गुंडाची भूमिका साकारली आहे. गायत्री- पुष्कर दिग्दर्शित हा सिनेमा एक क्राइम थ्रिलर आहे.

आर. माधवन आणि विजय यांच्याशिवाय या सिनेमात वरलक्ष्मी सारथकुमार, श्रद्धा श्रीनाथ आणि जॉन विजय यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे चित्रिकरण जानेवारीमध्येच पूर्ण झाले असून सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम केले जात आहे.

‘साला खडूस’ हा आर. माधवनचा शेवटचा हिंदी सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगली कमाई केली होती. या सिनेमात माधवनने मार्शल आर्ट्स प्रशिक्षकाची भूमिका साकारली होती. या सिनेमातून अभिनेत्री रितिका सिंग हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. साला खडूस या सिनेमातही त्याचा लूक रावडी, टफ असाच ठेवण्यात आला होता.

‘विक्रम वेधा’ या सिनेमानंतर माधवन मल्याळम सिनेमा ‘चार्ली’च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. या रिमेकमध्ये जलकेर सलमान याची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एएल विजय यांचे असून या सिनेमातून तमिळमध्ये साई पल्लवी ही अभिनेत्री पदार्पण करणार आहे.

Story img Loader