एक व्हिलन’ चित्रपटात रितेश देशमुख हे एक ‘सरप्राइज’ होते, याचा साक्षात्कार खुद्द रितेशसह बॉलीवूडमध्ये अनेकांना झाला. पाठोपाठ आलेल्या ‘आपला हात भारी आणि लाथ भारी..’चा आवाज मराठीची दारं तोडून हिंदी चित्रपटसृष्टीतही अनेकांच्या कानात शिरला आणि मग केवळ विनोदी चित्रपटांमधला अभिनेता म्हणून त्याच्यावर लावलेलं लेबल लगोलग पुसत त्याला कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका हिंदीतील मोठय़ा निर्मात्यांनी देऊ केल्या आहेत. अलिबाबाच्या गुहेसारखा संधींचा एक मोठा खजिना आपल्यासमोर खुला झाला आहे, असे रितेश देशमुख म्हणतो. मात्र, ज्या चित्रपटांनी कारकीर्दीत यश मिळवून दिलं त्या ‘मस्ती’ आणि ‘हाऊसफुल्ल’सारख्या सिक्वलपटांचा मार्गही सोडायचा नाही, हे त्याने पक्कं ठरवलं आहे.
रितेश देशमुख समोर आल्यानंतर अजूनही ‘लय भारी’चं कौतुक आठवल्याशिवाय राहात नाही. हो.. आता हल्ली मुलंसुद्धा कमरेवर तशीच हात ठेवून ‘माऊली’सारखी उभी राहून संवाद ऐकवू लागली आहेत, याचं त्यालाही नवल वाटतं; पण ‘लय भारी’ला मिळालेल्या यशामागे असलेलं प्रेक्षकांचं अ‍ॅक्शन चित्रपटांचं वेड, हिरोगिरी करणाऱ्या धीट नायकाचं असणारं आकर्षण या सगळ्या गोष्टी समजून घेता येतात. त्यामुळे ‘लय भारी’च्या यशाबद्दल आनंद आहे. तरी तेच यश असं मात्र मानायला रितेश तयार नाही. ‘माऊली’ ही व्यक्तिरेखा सगळ्यांनाच आवडली, लोकांनी तिला सहज आपलंसं केलं आहे; पण आता त्यात अडकून पडायचं नाही, असं तो म्हणतो. अजूनही ‘लय भारी’चा कमाईचा विक्रम कोणी मोडलेला नाही. लवकरात लवकर नवीन मराठी चित्रपटांनी ‘लय भारी’चा विक्रम मोडायला हवा. तरच आणखी कुठला तरी त्यापेक्षाही चांगला चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी आपली भावना असल्याचे रितेश सांगतो.
‘एक व्हिलन’मध्ये राकेश महाडकरची भूमिका साकारणाऱ्या रितेशला चित्रपटाच्या यशाचं श्रेयही मिळालं. तो चित्रपट संपला आणि लगेचच रितेशकडे दोन वेगळे चित्रपट होते ते म्हणजे एक्सेल एंटरटेन्मेंटचा ‘बंगिस्तान’ आणि यशराज बॅनरचा ‘बँकचोर’. त्यापैकी करण अंशुमान दिग्दर्शित ‘बंगिस्तान’ हा रितेशचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. रितेशने यात हफीज बिन अली या मुस्लीम तरुणाची भूमिका साकारली आहे. धर्माच्या नावाखाली तरुणांना भडकावणाऱ्या आणि जिहादचा मार्ग धरायला लावणाऱ्या संघटनांचा आणखी एक बळी असलेला हफीज धर्मासाठी ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार होतो. मात्र, त्यासाठी त्याला हिंदूू तरुणाचं रूप धारण करावं लागतं. ईश्वर शर्मा नावाने वावरणारा, पण आतून मनाने कडवा मुसलमान असल्याने एका विचित्र मानसिक द्वंद्वात अडकलेल्या हफीजची भूमिका खरोखरच आव्हानात्मक होती, असं रितेशने सांगितलं. ‘बंगिस्तान’ हा अत्यंत प्रभावी पटकथा असलेला चित्रपट आहे. आपला धर्म टिकवण्यासाठी हिंसेचं शस्त्र हातात घेतलेले दोन वेगवेगळ्या धर्माचे तरुण योगायोगाने एकत्र येतात, त्यांचा एकमेकांमधला संवाद त्यांना त्यांच्या विचारांतला फोलपणा, त्यांच्या संघटनांमधला दांभिकपणा उघड करून दाखवतो. वरकरणी दुसऱ्या धर्माची झूल पांघरलेल्या आतल्या मनालाही शेवटी कुठलाही धर्म एकच सत्य सांगतो, याची जाणीव होते तेव्हा जग बदलून जातं, हा विचार या चित्रपटातून मांडला आहे, असं रितेश सांगत असतो. हा विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणं सोपं नाही, पण दिग्दर्शक करण अंशुमानने पहिलाच चित्रपट असूनही लीलया हा विषय पेलला असल्याचं तो म्हणतो.
रितेशने ‘बंगिस्तान’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या ‘एक्सेल एंटरटेन्मेट’बरोबर काम केलं आहे. निर्माते म्हणून वेगळ्या पद्धतीचे सिनेमे करण्यात या दोघांचाही हातखंडा आहे, असं सांगणारा रितेश फरहानचं एक विचारी अभिनेता, निर्माता म्हणून प्रचंड कौतुक करतो. त्यांच्या चित्रपटात काम करायचा अनुभव तुम्हाला खूप काही शिकवून जातो, असं रितेशला वाटतं. आता तर यशराजच्या ‘बँकचोर’चंही चित्रीकरण पूर्ण झालं आहे. शिवाय, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘हाऊसफुल्ल ३’ हे दोन त्याच्या नेहमीच्या जॉनरचे चित्रपटही तो करतो आहे. या चित्रपटांनाही माझ्या लेखी तितकंच महत्त्व आहे. माझी कारकीर्द या अ‍ॅडल्ट कॉमेडीपटांनी वाढवली. ‘हाऊसफुल्ल ३’मध्ये अभिषेक आणि अक्षयकुमारबरोबर काम करतो आहे. ते दोघेही चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करण्याचं कारणच नाही. ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा चित्रपट दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्यामुळे जवळचा आहे. तुमच्या चित्रपटांना मिळणारं यश हे फार कमी दिवसांचं असतं. तुम्हाला लगेचच दुसऱ्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करावंच लागतं. म्हणजे, ‘एक व्हिलन’ हा चित्रपट माझ्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे; पण असा एखादाच चित्रपट तुमच्या वाटय़ाला येतो. त्यामुळे पुन्हा तोच आणि तसाच चित्रपट मिळेल म्हणून वाट पाहण्यात हशील नाही. तुम्हाला प्रत्येक प्रकारचा चित्रपट, भूमिका केलीच पाहिजे, असं आपलं अनुभवी मत रितेश निग्रहाने मांडतो.
बॉलीवूडमध्ये व्यग्र असलेला रितेश मराठी चित्रपटावरही लक्ष ठेवून आहे. ‘माऊली’ हे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या ‘माऊली’चा आणि ‘लय भारी’चा कुठल्याही प्रकारे संबंध नाही, सिक्वल नाही हेही त्याने स्पष्ट केलं; पण सध्या तरी ‘बंगिस्तान’ वगळता आपल्या इतर आगामी चित्रपटांबद्दलच्या गोष्टी पोतडीतून एकदम बाहेर काढायचीही त्याची तयारी नाही. चित्रपटांबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातही वडील म्हणून मिळालेल्या नवीन भूमिकेने एकाच वेळी सुखाची आणि जबाबदारीची जाणीव दिली असून सध्या तेही शेडय़ूल व्यवस्थित सांभाळत असल्याचे त्याने हसत हसत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा