‘फास्ट अँड फ्यरियस’ या चित्रपट मालिकेतून लोकप्रिय झालेला प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता विन डिझेल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विन डिझेलची माजी सहकारी ॲस्टा जॉनसनने आरोप केला की, २०१० साली तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. याबद्दल लॉस एंजेलिस न्यायालयात विन डिझेलच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला आहे. २०१० साली फास्ट फाईव्ह या चित्रपटाच्या निमित्ताने विन डिझेल आणि ॲस्टा जॉनसन एकत्र काम करत होते. चित्रीकरणा दरम्यान ॲटलांटा हॉटेलमध्ये सदर गुन्हा घडला असल्याचा दावा पीडितेने तक्रारीत केला आहे.
लॉस एंजेलिसच्या न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यातील तक्रारीत म्हटले की, विन डिझेलने हॉटेलमध्ये ॲस्टावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ॲस्टाने शारीरिक जवळीक साधण्यासाठी स्पष्ट नकार दिलेला असतानाही विन डिझेलने त्याकडे दुर्लक्ष करत लैंगिक अत्याचार केले. न्यायालयात ॲस्टाच्या वकिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत या किळसवाण्या घटनेचा सर्व तपशील कथन केला आहे.
या धक्कादायक प्रकाराच्या काही तासानंतर विन डिझेलची बहिण आणि ‘वन रेस’ या कंपनीची अध्यक्ष समांथा विन्सेंटने ॲस्टा जॉनसनला कामावरून काढून टाकले. ॲस्टाची नेमणूक समांथानेच केली होती. ॲस्टाने दाखल केलेल्या खटल्यात म्हटले की, विन डिझेलच्या लैंगिक अत्याचाराला विरोध केल्यामुळेच ॲस्टा जॉनसनला कामावरून काढून टाकण्यात आले. ॲस्टाची हकालपट्टी करून विन डिझेलचे किळसवाणे कृत्य झाकण्याचा प्रयत्न झाला.
“प्रभावशाली व्यक्तींना जोपर्यंत सुरक्षा पुरविली जाईल, तोपर्यंत कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक अत्याचार थांबणार नाहीत. या प्रकणात पीडितेने समोर येऊन तक्रार करण्याची आणि आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडण्याची जी हिंमत दाखविली त्यावरून इतर पीडितांनाही बळ मिळेल”, अशी प्रतिक्रिया ॲस्टा जॉनसनच्या वकील क्लेअर कटले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली.
आणखी वाचा >> दीपिकासह विन डिझेलने घेतला मुंबईच्या ‘कटिंग चाय’चा स्वाद
हॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट मालिकांमध्ये ‘फास्ट अँड फ्युरियस’ या चित्रपटाचा समावेश होतो. आतापर्यंत या चित्रपटाचे दहा भाग प्रदर्शित झालेले आहेत. ‘फास्ट अॅण्ड फ्युरियसच्या सातव्या भागामध्ये भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही काम केलेले आहे.