संगीताप्रमाणेच नाटकालाही खरं तर कोणतीही भाषा नसते. हे सिद्ध झालंय पुण्याच्या ‘विनोद दोषी थिएटर फेस्टिव्हल’मध्ये. इथे झालेल्या विविध भाषिक नाटकांना नाटय़प्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खूप दिवसांनी गाढ झोप लागली होती. मऊ गादी, वर छान पंखा आणि तोही आपल्याला हव्या त्या स्पीडला. आज त्या पंख्याच्या स्पीडवरून कुणाशी भांडणही झालं नव्हतं. एकमताने पंख्याच्या स्पीडचा ठराव संमत झाला होता. वाह! आज बऱ्याच दिवसांनी वाटत होतं; आयुष्यात झोपेशिवाय दुसरं काही कामाचं नसावं. असे दिवस फार कमी येतात. आलेलाच आहे तर कशाला फुकट घालावा? म्हणून मी ऐटीत ताणून दिली. डोक्यावरून पांघरूण घेऊन.
माझा डोळा लागलाच होता. इतक्यात माझ्यासमोर एक आडदांड व्यक्ती आली. चेहरा झाकलेला होता. तोंडासकट. फक्त डोळे दिसत होते. हिरवे. मांजरीसारखे. त्याने माझ्या डोक्यावरचं पांघरूण झपकन काढलं, मला पंखा जरा जास्त जोरात फिरतोय असं जाणवलं क्षणभर. मनात म्हटलं आजच या माणसाला चोरी करायचा मुहूर्त मिळाला का? आणि ते पण आमच्याच घरात. वाटलं त्याला सांगावं, ‘अरे बाबा, कशाला चोरी करतोस? तीही रात्रीच्या झोपेचा त्याग करून. तू पण झोप आणि मला पण झोपू दे’. पण त्या पठ्ठय़ाने मला काही बोलूच दिलं नाही. तो खरं तर काहीच बोलू शकत नव्हता. मुका होता किंवा तोंड इतकं घट्ट बांधलं होतं की ते उघडताच येत नव्हतं माहीत नाही. तर त्याने हाताने मला त्याच्यासोबत येण्याची खूण केली. मी झोपेतून पुरी जागीच झाले नव्हते, माझ्या मेंदूपर्यंत गोष्टी पोहोचत नाही आहेत हे त्याला कळलं असावं बहुतेक. त्याने माझा हात धरून खेचत घराबाहेर काढलं. इतक्या कमी वेळात माझ्या मेंदूचा अंदाज येणारा हा माणूस आहे तरी कोण? याची मला फार उत्सुकता होती. पण त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता लागली होती ती म्हणजे हा मला नेमकं कुठे घेऊन चालला आहे याची. तो आणि मी रस्त्यातून चालत होतो. रात्रीचे २.०० वाजले होते. एवढय़ा रात्री एका अनोळखी माणसासोबत मी चालतेय हे बघून क्षणभर मला ‘संस्कृती’वगैरे आठवली. मला त्याची भाषा वगैरे काही माहीत नव्हती तरी हिंदी सर्वज्ञात आहेच म्हणून मी एकदा ‘घरी जाते’ असं म्हटलं तर त्याने काहीतरी अमाप हावभाव केले. ज्यावरून मला इतकंच कळलं की माझ्या आई आणि बाबांना माहीत आहे की मी अशी फिरते आहे. चला ‘संस्कृती’ नावाची काळजी मिटली. म्हणजे मला काहीच फिकीर नव्हती; पण उगाच चूक नसताना ऐकून कशाला घ्या!
तर आता मला काळजी वाटली, हा मला कुठे घेऊन जातो आहे याची. घरी माहिती आहे म्हणजे अज्ञात स्थळ नसावं. थोडय़ा वेळाने आम्ही रस्त्याच्या एका कडेला उभे राहिलो. असंख्य माणसं येत जात होती. वेगवेगळ्या भाषेतली. वेगवेगळ्या पोशाखातली. एक तर मुकं जोडपं होतं एका कोनाडय़ात बसलेलं. एकमेकांच्या हावभावावरून हसत खिदळत होतं. आपल्याला बोलता येत असून आपल्यात मोघमच संवाद घडतात. त्यांच्यातलं निखळ प्रेम बघून वेगळंच वाटलं. एक आई मध्यरात्री आपल्याच मुलाला शिव्यांच्या लाखोल्या वाहून धू-धू धुवत होती अशा भल्या रात्री. भाषा तर कळत नव्हती, पण एकंदर हावभावावरून कळून चुकलं की मुलाने चोरी केली होती म्हणून त्याला चोप मिळत होता. असे बरेच प्रसंग दिसले; पण हे मलाच का? हे काही केल्या कळत नव्हतं. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते अधूनमधून तर त्याचा चेहरा निर्विकार होता. माशीसुद्धा हलत नाही एखाद्याच्या चेहऱ्यावरून म्हणतात ना तसं झालं होतं अगदी. आता तो पुन्हा मला घेऊन जात होता कुठे तरी. आमचा रोजचाच रस्ता होता. खरंच अज्ञात ठिकाण नव्हतं; पण रात्री हा रस्ता हे असं रूप धारण करतो हे कधीच पाहिलं नव्हतं. परतीचा रस्ता होता. म्हणजे मला कळत होतं की हा माणूस मला पुन्हा घरी घेऊन जातोय. त्यालाही काहीच बोलता येत नव्हतं. भाषा केवळ हातवाऱ्यांची होती. पण कुठेही मला असुरक्षित वाटेल असं काहीही त्याने केलं नाही. मला मी जिथे होते तिथे आणून त्याने सोडलं आणि हातात एक कागद दिला. कागदावर लिहिलं होतं; ‘नाटक म्हणजे रोजच्या आयुष्याचा आरसा. जे काही तू बघितलंस त्यात कुठेही तुला समजेल अशी भाषा नव्हती. भावनांची एक नवीन भाषा तुमच्यात तयार झाली आणि मग शब्दांची गरज नाहीशी झाली. नाटक हे असंच भाषेचं बंधन नसलेलं असतं. तुझा हितचिंतक.’
आणि माझा गजर वाजला. स्वप्न होतं. हुश्श्श्श!!! पण स्वप्नातला माणूस लोकप्रभाच्या सदराचा वाचक असावा बहुतेक. योग्य वेळेला स्वप्नात आला होता. त्याने दिलेल्या पत्रात वाक्यं अर्धवट होती; पण अर्थहीन नव्हती. माझ्या पुढच्या विषयाची एक सुरुवात या स्वप्नाने मला करून मिळाली.
पुण्यात नुकताच विनोद दोषी यांच्या स्मृतीला उजाळा देणाऱ्या ‘विनोद दोषी थिएटर फेस्टिव्हलचं आठवं पुष्प पार पडलं. या महोत्सवात वेगवेगळ्या भाषांमधली आठ नाटकं सादर करण्यात आली. या नाटकांना उत्स्फूर्त आणि मनमुराद दाद मिळाली. हा महोत्सव २२ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी या दरम्यान पुण्याच्या यशवंत नाटय़गृहात पार पडला. या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजक अशोक कुलकर्णी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. या महोत्सवाच्या आयोजनाबाबत त्यांचा हेतू सामान्य लोकांपर्यंत नाटक पोहोचावं आणि त्यांनाही ते सादर करण्याची संधी मिळावी असा होता. एक एक्सिपिरिमेंटल थिएटर म्हणून या महोत्सवाकडे ते बघतात. गेली ७ वर्षे ते या महोत्सवाचं आयोजन करत आहेत. विनोद दोषी हे प्रयोगशील थिएटरमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व. त्यामुळे त्यांचं नाव या महोत्सवाला द्यायचं ठरलं. पहिली दोन-तीन वर्षे त्यांनी मराठी नाटकांचा महोत्सव साजरा केल्यानंतर त्यांना वाटलं की, आपण वेगवेगळ्या प्रांतातली आणि वेगवेगळ्या भाषांमधली नाटकं या महोत्सवात सादर केली पाहिजेत आणि तसं त्यांनी लोकांना आवाहन केलं. उत्तम प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या सुरुवातीपासून सक्रिय सहभाग दर्शवणारा मोहित टाकळकर म्हणाला की, त्याची पाच नाटकं आतापर्यंत या महोत्सवात सादर झाली. त्याने दिग्दर्शन आणि अभिनय असा दोन्हींचा अनुभव घेतला. त्याला या महोत्सवामधली भावलेली गोष्ट म्हणजे तिथे नाटय़कृतीला मान दिला जातो. प्रत्येक नाटकाला दिलखुलासपणे दादही दिली जाते. तो सांगतो की पहिली दोन-तीन वर्षे फक्त नाटकातले जाणकार या महोत्सवाला गर्दी करत होते, पण गेल्या पाच वर्षांपासून सामान्य माणूसही या महोत्सवाला हजेरी लावतो. प्रत्येक दिवशी नाटय़गृह हाऊसफुल असतं आणि जिथे कलाकाराला अशी मनमुराद दाद मिळते तिथे ती कला फुलत जातेच जाते.
या वर्षी महोत्सवात प्रामुख्याने हिंदी, उर्दू, मराठी, इंग्रजी, काश्मिरी आणि पंजाबी या भाषांमधली नाटकं सादर झाली. ‘गणपती’ हे वीणापाणी चावला यांनी दिग्दर्शित केलेलं ‘तमिळ’ नाटक होतं, ज्यात गणपतीच्या जन्माची कथा नाटय़ रूपात तमिळ भाषेतून लोकांच्या समोर आली. मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेलं ‘में हु युसूफ और ये है मेरा भाई’ हे प्रेमाच्या वेगवेगळ्या आविष्कारांचं दर्शन घडविणारं हिंदी-उर्दूमधलं नाटकही प्रेक्षकांची दाद मिळवून गेलं. अलोक राजवाडे दिग्दर्शित ‘सिंधू, सुधाकर, रम आणि इतर’ हे मराठी नाटक राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ या नाटकाचं पुन:कथन या रूपाने मराठी भाषेत सादर करण्यात आलं. सुनील शानबाग दिग्दर्शित ‘ब्लॅक पेज’ हे नाटक इंग्रजी, मराठी, हिंदी आणि काश्मिरी या भाषांमधल्या कवितांचं सामूहिक नाटय़रूपातील वाचन होतं. एक वेगळाच बाज या निमित्ताने रंगमंचावर घडत होता. शेवटच्या दिवशी ‘नागमंडळ’ नीलम मनसिंघ चौधरी यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक हे दोन आख्यायिकांवर आधारित असलेलं नाटक होतं. या सगळ्या सादरीकरणातून मराठी रंगभूमी आणि इतर भाषांमधल्या रंगभूमीचा फरकसुद्धा प्रेक्षकांच्या दृष्टीस पडला आणि तो सुखावह होता. एक वेगळाच अनुभव तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकाला मिळत होता.
या वर्षीही महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला. प्रत्येक दिवशी ७००-८०० प्रेक्षकांच्या टाळ्यांनी नाटय़गृह दुमदुमत होतं. दरवर्षी पुण्यात ‘विनोद दोषी नाटय़ महोत्सवाची’ नाटय़प्रेमी वाट बघत असतात. वेगवेगळी भाषा असूनही लेखकांनी, दिग्दर्शकांनी हाताळलेले विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. ही कुठली भाषा होती? मला वाटतं ‘तो’ माणूस म्हणाला तसं भावनांची किंवा मग ‘शून्य’ भाषा. जिचा अर्थ फक्त नाटय़प्रेमींनाच कळतो आणि जो नाटय़सृष्टी जिवंत ठेवतो. आज मी पुन्हा लवकर झोपणार आहे. मला ‘त्या’ स्वप्नातल्या माणसाचा शोध घ्यायचाय आणि त्याला ही ‘शून्य’ भाषा दाखवायचीये. तुम्हालाही सापडते का बघा नाटकाची ‘शून्य’ भाषा.
ऋतुजा फडके – response.lokprabha@expressindia.com