छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा कॉमेडी शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा.’ या कार्यक्रमातील सर्व कलाकारांनी नुकतीच बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये हजेरी लावली. दरम्यान ते विनोदाचा बादशाह समीर चौघुले समोर आदराने झुकले आहेत. त्यांच्या भेटीचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला असून चर्चेत आहे.
‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर गेल्यावर समीर चौघुले अमिताभ बच्चन यांच्याशी बोलायला गेले. तेव्हा समीर बिग बींना म्हणाले की मला तुमच्या पाया पडायचे आहे. ‘तुम्ही नका माझ्या पाया पडू, मी तुमच्या पडतो’ असे अमिताभ म्हणाले. सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन आणि समीर चौघुले यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अभिनेता प्रसाद ओकने देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने, ‘काही काही मित्र आयुष्यात स्वप्नपूर्ती साठीच आलेले असतात…तसाच एक जवळचा मित्र म्हणजे “अमित फाळके”. ज्यांनी 2009 साली माझं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न पूर्ण केलं… मला “हाय काय नाय काय” करता आला तो अमित मुळेच. आणि आता आयुष्यातलं अजून एक स्वप्न पूर्ण झालं ते ही त्याच्यामुळेच. ज्याला मी देव मानत आलोय त्याचं दर्शन झालं… प्रत्यक्ष “बच्चन” साहेबांचं… महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम बच्चन साहेब नियमित पाहतात आणि त्यामुळे आमच्या पूर्ण टीम चं कौतुक करण्यासाठी त्यांनीच ही संधी आम्हाला दिली. हास्यजत्रेच्या टीम चा भाग असल्याचा आज प्रचंड अभिमान वाटतोय. मनःपूर्वक आभार’ असे कॅप्शन दिले आहे.