बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या लग्नाचा मुद्दा जुना झाला. काँग्रेसच्या युवराजांच्या लग्नाचा विषयही गुजरातच्या निवडणुकीत मागे पडला. त्यानंतर आता सुट्टीवर असणारा भारतीय कर्णधार विराट कोहली ट्रेंडमध्ये आलाय. श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकल्यानंतर कोहली आता थेट नव्या वर्षात दक्षिण आफ्रिकेतच मैदानात उतरणार आहे. महिनाभराच्या विश्रांतीमध्ये तो अनुष्काला किती वेळ देईल, हा प्रश्न दोघांच्या चाहत्यांना पडणार हे अगदी स्वाभाविक होते. पण, या महिन्यात तो आयुष्याची नवी इनिंग सुरु करण्यासाठी परदेशी ‘टेकऑफ’ वैगेरे करणार हे ऐकायला मिळणं म्हणजे श्रीलंकन खेळाडूंनी अचानकपणे मास्क बांधून मैदानात उतरुन लक्ष वेधून घेतल्या सारखाच प्रकार होता.

विराट-अनुष्काची लग्नघटिका समीप आल्याची चाहूल गल्लीपासून दिल्लीपर्यंत ओखी वादळासारखी पसरली. सोशल मीडियावर या चर्चांना उधाण येण्यास सुरुवात झाली. या सर्व प्रकारानंतर मैदानातील जोरदार अपीलनंतर पंचांने स्तब्ध भूमिका घ्यावी, तशीच दोघांनी स्तब्ध भूमिका घेतली. दिल्ली कसोटीनंतर ना विराट कॅमेऱ्यासमोर आला ना अनुष्काने वृत्ताला दुजोरा दिला. मात्र, मुंबई विमानतळावर आपल्या कुटुंबासह अनुष्काने दिलेलं दर्शन विराट-अनुष्का नवीन इनिंगला सुरुवात करतील, याचे संकेत देऊन गेले.

लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या विराट-अनुष्काच्या जोडीची चर्चा रंगण्याची ही पहिली वेळ नाही. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला ज्या जोडीच्या लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे दिसते. या जोडीला एकेकाळी चाहत्यांच्या आणि प्रसारमाध्यमांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. विराट-अनुष्का यांच्यात प्रेम फुलत असल्याची चर्चा रंगल्यानंतर अनेकदा या जोडीबद्दल चर्चा रंगली. यात विराटच्या अपयशावेळी अनुष्काच्या माथी खापर फोडण्यास चाहत्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. २०१५ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात विराट कोहली अवघ्या एका धावेवर बाद झाला. या सामन्यात विराटला प्रोत्साहन देण्यास स्टेडिअममध्ये आलेल्या अनुष्कावर क्रिकेट चाहत्यांनी निशाणा साधला होता. विराटच्या खराब कामगिरीचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. यावेळी विराटने टीकाकारांना चोख प्रत्त्युर दिले.

त्यानंतर दोघांच्यात दुराव्याच्या चर्चा रंगल्या. काही काळानंतर अनुष्काच्या नावाने हंगामा करणाऱ्या चाहत्यांमध्ये दोघांनी एकत्र यावे, असे वारे वाहू लागले. विराट-अनुष्काच्या नात्यातील अनेक चर्चेनंतर अवघ्या दोन वर्षानंतर आता या जोडीच्या विवाहाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही जोडी नक्की लग्न कोणत्या ठिकाणी करणार याबाबतही उलट सुलट चर्चा सुरु आहे. ज्या ऑस्टेलियाच्या मैदानात क्रिकेट चाहत्यांनी अनुष्कावर टीका केली होती. त्या ठिकाणी ही जोडी विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. यापूर्वी इटलीमध्ये विवाह सोहळा रंगणार असल्याची चर्चा रंगली होती. एकूणच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या जोडीच्या खासगी आयुष्यात डोकावण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे योग्य की अयोग्य? हा मोठा संभ्रमात टाकणारा प्रश्न आहे. पण लोकप्रिय व्यक्तिमत्वाला यातून जावेच लागते. तेव्हा आपल्याकडे दृढ झालेल्या मानसिकतेमुळे विराट-अनुष्का जोडीनं सुरु केलेला लपंडाव कोणते नवे वळण घेणार हे समजण्याचा खटाटोप थांबणं मात्र कठीणच आहे.