आयपीएलच्या १७ व्या हंगमाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा भव्य अनबॉक्स इव्हेंट बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला RCB च्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी RCB च्या महिला संघाचा पहिलं जेतेपद पटकावल्यानंतर खास सन्मान करण्यात आला.
आरसीबीच्या अनबॉक्स इव्हेंटला यंदा प्रसिद्ध इंटरनॅशनल डीजे एलन वॉकरने हजेरी लावली होती. यावेळी त्याची आणि विराट कोहलीची भेट झाली. सध्या त्यांच्या भेटीला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराट आणि एलनने एकमेकांना हस्तांदोलन केलं. तसेच या डीजेने कोहलीला स्वत:चा परिचय करून दिला. यानंतर तुझं भारतात स्वागत आहे असं विराट एलनला म्हणाला.
पुढे हा प्रसिद्ध डीजे कोहलीला “तुझं खूप खूप अभिनंदन! तुला मुलगी झाल्याचं मी ऐकलं” असं म्हणाला. यावर विराटने लगेच एलनची चूक दुरुस्त करत “मला मुलगा झालाय” असं त्याला सांगितलं. यावर एलन “अच्छा मुलगा झालाय वाह अभिनंदन” असं म्हणाला. सध्या या दोघांमध्ये झालेल्या या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, विराट कोहलीच्या लेकाचा म्हणजे अकायचा जन्म गेल्या महिन्यात १५ फेब्रुवारीला झाला. सध्या त्याचं संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये आहे. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर २०१७ मध्ये विराट-अनुष्काने लग्नघाठ बांधली होती. या जोडीची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. २०२१ मध्ये अनुष्काने वामिकाला तर, फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला.
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर वामिकाच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. ती शेवटची २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात झळकली होती. आता लवकरच ती ‘चकदा एक्स्प्रेस’ या बायोपिक चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे.