भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक स्पर्धेत आणि अंतिम सामन्यात कौतुकास्पद कामगिरी करीत नुकताच विश्वचषक जिंकून भारतात आणला आहे. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक विजय मानला जात आहे. एकीकडे विजयाचा आनंद साजरा करतानाच विराट कोहलीने हा त्याच्या टी-२० फॉरमॅटमधील शेवटचा सामना असल्याचे घोषित केले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी विराटच्या या निर्णयामुळे दु:ख झाल्याचे म्हटले होते. आता विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या पत्नीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये विराट म्हणतो, “तुझ्याशिवाय हे सगळं सहज शक्य झालं नसतं. मी नम्र असण्याचं, माझे पाय जमिनीवर असण्याचं सगळं श्रेय तुला जातं आणि नेहमीच तू हे प्रामाणिकपणे करतेस, मला सांगतेस. मी तुझ्याविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे. हा विजय जितका माझा आहे, तितकाच तुझादेखील आहे. त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद आणि तुझ्यावर मी खूप प्रेम करतो.” विराटने अनुष्काबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करणारी ही पोस्ट शेअर करताना त्याने अनुष्काबरोबरचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

विराटने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर प्रियंका चोप्रासह अनेक कलाकारांनी कमेंट करीत प्रेम व्यक्त केले आहे. मनोरंजनसृष्टीत आणि क्रिकेटविश्वात विराट-अनुष्काची जोडी प्रसिद्ध असून, या दोघांचा चाहतावर्गही मोठा आहे. हे जोडपे नेहमीच एकमेकांबद्दल आदर व्यक्त करताना दिसते. २०१७ साली हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर २०२१ ला वामिकाचा जन्म झाला आणि यंदाच्या फेब्रुवारीमध्ये अनुष्काने मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अकाय’ ठेवले असून, या नावाचीही मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: किरण मानेंची पोस्ट, “आजही पूर्वीप्रमाणेच तुकोबा आणि अनगडशा फकीर एक झाले, तर अनेक कारस्थान्यांच्या..”

दरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या टी-२० विश्वचषकासाठीच्या अंतिम सामन्यानंतर टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्यानंतर अनेकांनी विराटच्या या निर्णयाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. विवेक ओबेरॉयने एकाच वेळी आनंद आणि दु:ख झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. विश्वचषकामधील ऐतिहासिक विजयाचा आनंद एकीकडे; तर विराटच्या टी-२० मधील निवृत्तीचे दु:ख दुसरीकडे झाल्याचे विवेकने म्हटले आहे बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगनेदेखील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत “किंग कोहलीनं शेवटी त्याचा एक्का टाकून विजय मिळवलाच. विराट कोहलीनं स्वत:ची ही कारकीर्द या टप्प्यापर्यंत आणण्याचा त्याचा हा प्रवास अविश्वसनीय आहे”, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.