सोशल मीडिया आजकाल सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वांसाठी महत्त्वाचे माध्यम झालेले आहे. या माध्यमातून ते आपल्या आयुष्यातील अनेक महत्वाचे प्रसंग बाहेरच्या जगाबरोबर शेअर करीत असतात. परंतु, आता विराट कोहलीने क्रिकेटप्रमाणेच सोशल मीडियावरही नवा विक्रम केला आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर विजयाचे क्षण साजरे करताना काही फोटो शेअर केले होते. आता ही पोस्ट सोशल मीडियावर सर्वाधिक लाइक्स मिळालेली पोस्ट ठरत आहे. या फोटोंच्या पोस्टला १८ दक्षलक्ष लोकांनी लाइक केले आहे.

याआधी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नातील फोटोंनी सर्वाधिक लाइक्स मिळवीत विक्रम केला होता. त्यांच्या फोटोला १६ दक्षलक्ष लाइक्स मिळाले होते; परंतु विराटने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोला १८ दक्षलक्ष लाइक्स मिळाले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शर्थीची खेळी करीत विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघासह ट्रॉफीचा फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर शेअर केला होता. त्याबरोबरच आपल्या सहकाऱ्यांसह हा विजय साजरा करताना शेअर केलेल्या फोटोमध्ये तो पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करताना त्याने, “यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्नही पाहिले नसते. देव दयाळू आहे आणि मी कृतज्ञतेने माझे डोके टेकवतो. आम्ही शेवटी हे करून दाखवले. जय हिंद!”, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

२०२३ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कियारा आणि अभिनेता सिद्धार्थ यांच्या लग्नाच्या फोटोंनी भारतात इन्स्टाग्रामवर सर्वांत जास्त लाइक्स मिळविण्याचा विक्रम केला होता. ७ फेब्रुवारीला त्यांनी लग्नगाठ बांधली असून, त्यांच्या लग्नातील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. इन्स्टाग्रामवर चाहत्यांनी त्यांच्या फोटोंना लाइक करीत प्रेमाचा वर्षाव केला होता. सिद्धार्थ आणि कियाराच्या आधी आलिया भट्ट रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या फोटोंना १३.१९ दशलक्ष लाइक्स मिळाले होते.

दरम्यान, विराटच्या पोस्टला अजूनही लाइक्स मिळत असले तरी लिओनेल मेस्सीच्या पोस्टला मिळालेल्या लाइक्सपेक्षा ते खूप कमी आहेत. २०२२ मध्ये फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद साजरा करतानाचा फोटो त्याने शेअर केला होता. संपूर्ण जगभरातील चाहत्यांनी त्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला होता. आता विराट कोहलीची पोस्ट किती लाइक्सचा टप्पा पूर्ण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, एकीकडे ‘सामनावीर’ ठरत विराटने टी-२० विश्वचषकाच्या विजयात मोलाचे योगदान दिले; तर दुसरीकडे टी-२० मधून निवृत्तीची घोषणा करीत चाहत्यांना भावूक केले.