छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा लोकप्रिय मराठी कॉमेडी शो आहे. मराठी मालिकांबरोबरच प्रेक्षक त्यांच्या कुटुंबासोबत हा कॉमेडी शो आवर्जून पाहतात. गेल्या वर्षी या शोने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावले होतं. या शोमधील प्रेत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यात समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांची जोडी आणि त्यांचं स्किट हे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरतं. अनेक पात्र, नाना तर्हेचे विनोद करून यांनी आपल्याला लोटपोट केले. पण आता मात्र ही जोडी आपल्याला कार्यक्रमात दिसणार नाही.
हास्य रसिकांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी आहे. विशाखा आता आपल्याला या शोमध्ये दिसणार नाही आहे. नुकतेच या मालिकेने ५०० भागांचा टप्पा पूर्ण केला. या निमित्ताने मोठे सेलिब्रेशनही करण्यात आले होते. ५०० नव्हे तर ५००० भाग पूर्ण होतील अशा शुभेच्छा या मालिकेला प्रेक्षकांनी दिल्या आणि अशातच हा एक मोठा धक्का प्रेक्षकांना मिळाला आहे. विशाखाने फेसबूकवर एक पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे.
एक निर्णय असे सांगत विशाखा म्हणाली, “नमस्कार मंडळी..अनेक वर्ष.. स्किट फॉरमॅटमध्ये काम करतेय. कॉमेडी एक्सप्रेस, फु बाई फु, बुलेट ट्रेन, आणि हास्यजत्रा..! २०११ मध्ये पहिलं पर्व विजेता जोडी,मांगले आणि मी.. ते आज २०२२ समीर विशाखा..असा मोठा प्रवास आहे. हा प्रवास खरंच सोपा नाहीय. मी काही फार मोठी विनोदी अभिनेत्री नव्हतेच कधी, पण दिलेली भूमिका तडीस नेणे, त्यात काय करता येईल ह्याचा शोध घेणे किंवा जे लेखकाने लिहिले आहे ते उत्तमरित्या बाइंडिंग करून सादर करणे हे मात्र प्रामाणिकपणे केलं. माझ्या सहकलाकारांच्या साथीने, आम्हा दोघांचीही काम कशी फुलतील ह्याचा विचार करतं, त्यांच्याबरोबर परफॉर्मन्ससाठी लागणारे ट्युनिंग, बॉण्डिंग, केमेस्ट्री सगळं क्रिएट केलं. प्रत्येक स्किट मी जगले. माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासात सचिन मोटे, सचिन गोस्वामींचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच मी विनोदी अभिनेत्री म्हणून ओळखली गेले. ‘Wet-cloud productions’च्या पहिल्या पहिल्या थेंबापासून ते आत्ता ह्याक्षणी डोळ्यात साठणाऱ्या थेंबपर्यंत मी जोडले गेले.”
आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…
पुढे विशाखा म्हणाली, “सातत्याने त्यांच्या सोबत काम करतेय..! आणि ह्या फॉरमॅटमध्ये ही एक फेरी हिंदी कॉमेडीमध्ये ही मारून आले..! दरवेळेस स्किट झाल्यावर किंवा होण्याआधीच टेन्शन भयानक असत. कालच्यापेक्षा चांगल करायचं, त्या टेन्शन मधून काहीकाळ बाहेर पडतेय..! (अजून दोन तीन एपिसोड दिसेन shoot झाले आहेत ते.) एक छान, उत्तम रंगवता येईल अशी भूमिका, मग ती फिल्म मधली २०/२५ दिवसांच्या प्रवासाची किंवा नाटक ५०० ते १ हजार प्रयोगाची, किंवा मग सीरियल मधली असो, मला ह्या वाटेवरचा प्रवास सुरु करायचा आहे..! इथलाही प्रवास खडतरच असतो, सोपा नाहीच तो. पण ना, इथे एकाच भूमिकेत राहून काही काळ प्रवास करता येतो, त्या भूमिकेबरोबर तिला न्याहाळात, तिला जपत, तिला अंजारातगोंजारात, तिला वेळ देऊन, तिच्यासोबत खेळता येत, शांत चित्ताने दिग्दर्शकाचा “ओके” हा शब्द कानाशी साठवून सुखाने घास घेऊन निजता येत.”
आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद
“आत्ता हे “असं” काम शांत चित्ताने करण्याची इच्छा झाली आहे..! रसिकहो आजवर तुम्ही माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेम केलेत. त्याबद्दल खरच मनापासून आभार. हास्य जत्रेने मला खुप काही दिलंय आणि तुम्ही जत्रेवर नितांत प्रेम केलेत.. जत्रेतल्या माझ्यावर भरभरून पत्र/ लेख लिहिलीत, कविता केल्यात..माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केलात,त्याबद्दल मी स्वतःला फार भाग्यवंत समजते. तुम्ही जसं हास्यजत्रे वर प्रेम केलंत तसच मी ही खुप प्रेम केल, करतेय आणि करेन. जीव ओतून काम केल..! प्रत्येक स्किट नंतर गोस्वामी काय म्हणतील ह्यासाठी कानाचे द्रोण ही केले..! त्यात कधी यश आल आणि कधी नाही..! प्रयत्न करत राहिले पण आत्ता थोडी धावपळ होतेय. मला खरंच अभिमान आहे कीं मी ह्या जत्रेचा भाग झाले.. आणि हा भाव मनात आयुष्यभर राहील”, असे विशाखा म्हणाली.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व
पुढे विशाखाने सगळ्या कलाकारांचे आभार मानले आहे. “माझ्या या हास्य प्रवासात समीरने महत्वाची साथ दिली त्यामुळे त्याचे आभार. तुझ्यातल्या वेडेपणाला सलाम आहे माझा. या कार्यक्रमाने खूप माणसं जोडली गेली. पण भाकरी भाजली की टोपलीत काढावी, आंबे तयार झाले तर उतरवावेत तसेच हा प्रवास थांबवून नवं बी पेरण्याची गरज आहे. मला काही मोठं काम मिळालं नाहीय किंवा मी दुसरी मालिका करत नाही किंवा नवीन पिढी तयार होतेय हे सहन होत नाहीय असले घाण आरोपही कोणी लावू नका. कारण पिढ्या घडायलाच हव्या…! आणि आपली एक्सिट पण ध्यानात असायलाच हवी. “जा आत्ता “असं म्हणण्यापेक्षा. “अर्रर्रर्रर्र “हे ऐकायला जास्त छान वाटतं नाही कां..! फक्त आता वेगळ्या धाटणीचे काही करण्याचा विचार आहे. त्यामुळे लवकरच दुसऱ्या भूमिकेतून भेटू,” असे म्हणतं विशाखाने सगळ्यांचा निरोप घेतला. त्यामुळे या पोस्ट नंतर आता विशाखाचा नवा अंदाज कसा असेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.