लोकसत्ता प्रतिनिधी, सांगली
मराठी रंगभूमीवरचा सर्वात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पदक पुरस्कार प्रशांत दामलेंना जाहीर झाला आहे. अभिनेते आणि नाट्य निर्माते प्रशांत दामले यांनी रंगभूमीसाठी दिलेलं जे योगदान आहे त्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. गौरवपदक, २५ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. ५ नोव्हेंबर या दिवशी म्हणजेच रंगभूमी दिनाच्या दिवशी हा पुरस्कार दिला जाणार आहे. अखिल भारतीय महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगली यांच्या वतीने मागच्या ५६ वर्षांपासून नाट्य क्षेत्रातील विविध कलाकारांना हा पुरस्कार दिला गेला आणि त्यांचा गौरव करण्यात आला. आता या पुरस्कारावर प्रशांत दामलेंनी त्यांचं नाव कोरलं आहे.
मराठी रंगभूमीवर प्रशांत दामले यांची कारकीर्द १९८३ मध्ये सुरु झाली. ‘टूरटूर’ या नाटकात प्रशांत दामले हे विनोदी अभिनेता म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांनी ‘मोरुची मावशी’ या नाटकात काम केलं. या नाटकापासून व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेलं काम हे आत्ताच्या ‘सारखं काहीतरी होतंय’ आणि ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ इथपर्यंत आलं आहे. नाटकाचे १२ हजार ५०० प्रयोग करणारा हा रंगभूमीवरचा हा एकमेव हरहुन्नरी कलावंत आणि विक्रमादित्य आहे.
अखिल भारतीय नाट्य परिषद, मध्यवर्ती, मुंबई चे अध्यक्ष प्रशांत दामले हे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आहेत, त्यांनी मागच्या चाळीस वर्षांपासून अनेक मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. मात्र रंगभूमी हे प्रशांत दामलेचं पहिलं प्रेम आहे.
मराठी चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता, रंगमंच अभिनेता, गायक, पार्श्वगायक, नाट्यनिर्माते आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत. कलेच्या प्रवासात त्यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत.
नाटकाशिवाय प्रशांत दामलेंनी ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘आम्ही सारे खवय्ये’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेचा समावेश आहे. आतापर्यंत त्यांना २० पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘महाराष्ट्र राज्य पुरस्कार’, ‘नाट्यदर्पण पुरस्कार’, ‘कलारंजन पुरस्कार’, ‘दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा यात समावेश आहे. फेब्रुवारी १९८३ पासून आज अखेर १२५०० पेक्षा जास्त नाटकांचे प्रयोग त्यांनी केले आहेत.
‘टूरटूर’, ‘पाहुणा’, ‘चल काहीतरीच काय’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘बे दुणे चार’, ‘शूSS कुठे बोलायचं नाही’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘जादू तेरी नजर’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘लेकुरे उदंड झाली’ अशा अनेक लोकप्रिय नाटकांचा समावेश त्यांच्या १२ हजार ५०० प्रयोगांमध्ये झाला आहे. सध्या प्रशांत दामले हे कविता लाड यांच्यासह एका लग्नाची पुढची गोष्ट आणि वर्षा उसगांवकर यांच्यासह सारखं काहीतरी होतंय ही दोन नाटकं करत आहेत. वर्षा उसगांवकर आणि प्रशांत दामले यांनी सुरुवातीला ब्रह्मचारी या नाटकांत काम केलं होतं. त्या नाटकातली त्यांची जोडी प्रेक्षकांना या नव्या नाटकातही भावली आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवणाऱ्या आणि त्यांचं मनोरंजन करणाऱ्या प्रशांत दामलेंना आता विष्णुदास भावे पुरस्काराने गौरवलं जाणार आहे. प्रत्येक रसिक प्रेक्षकासाठी आणि नाट्यप्रेमी प्रेक्षकासाठी ही अभिमानाची आणि गौरवाचीच बाब आहे.