कमल हसन यांचा वादग्रस्त ठरलेला चित्रपट ‘विश्वरुपम’चा रिमेक लवकरच येणार आहे. ‘विश्वरुपम २’ हा प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास कमल हसन यांनी व्यक्त केला. हसन यांनी मेजर वासीम अहमद काश्मिरीची प्रमुख मुख्य भूमिका केलेला ‘विश्वरुपम’वर मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमध्ये बंदी घातली होती. कमल हसन यांनी स्वतःची संपत्ती तारण ठेवून करोडो ऱुपये सदर चित्रपटात गुंतवले होते. दोन आठवडयांच्या विलंबानंतर ‘विश्वरुपम’ सर्व समस्यांतून बाहेर पडून प्रदर्शित झाला होता.
कमल हसन म्हणाले की, प्रसिद्धीसाठी नाही तर प्रेक्षकांच्या आनंदासाठी मी चित्रपट बनवतो. साधारणपणे, लोक वर्षभरानंतर चित्रपटाच्या रिमेकचा विचार करतात. पण मी सुरुवातीपासूनच ‘विश्वरुपम’चा दुसरा भाग करण्याचा विचार केला होता. ‘विश्वरुपम २’ हा माझा अहंकार नाही तर, आत्मविश्वास आहे. चित्रपटाची पूर्ण कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे मी चित्रपटाच्या कथेचे दोन भागात लिखाण केले. चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून भावनिक नातेसंबंधांशी निगडीत दृश्ये यात दाखविण्यात आली आहेत. चित्रपट न पाहताच ‘विश्वरुपम’च्या पहिल्या भागावर लोकांनी अनेक वाद निर्माण केले होते. मात्र, पूर्वार्धावर आधारित असलेला ‘विश्वरुपम २’ मध्ये रोमान्स आणि भावनिक पैलू केंद्रित करण्यात आले आहेत. तांत्रिकदृष्टया हा चित्रपट अधिक प्रगत असून यात पाण्याखाली काही दृश्ये चित्रीत करण्यात आली आहेत, असेही कमल हसन म्हणाले.