बॉलीवूडमधील अभिनेता अजय देवगण प्रस्तुत ‘विटीदांडू’ या चित्रपटाचा प्रीमिअर महाराष्ट्रात वा देशाच्या अन्य भागांत नव्हे तर थेट परदेशात होणार आहे. एखाद्या मराठी चित्रपटाचा पहिला खेळ अर्थात प्रीमिअर शो परदेशात आयोजित होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. प्रीमिअरची तारीख तसेच परदेशातील ठिकाण अद्याप निश्चित झाले नसले तरी ऑक्टोबरअखेरीस प्रीमिअर होण्याची शक्यता दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केली.
सध्या ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटाच्या खेळाबरोबर ‘विटीदांडू’ या चित्रपटाचा खास ट्रेलर दाखविण्यात येत आहे. हिंदी चित्रपटासोबत मराठी चित्रपटाचा ट्रेलर दाखविण्याचा हा प्रयोगही आगळा आहे. आजोबा आणि नातू यांचे भावबंध चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्येष्ठ आणि अष्टपैलू अभिनेते दिलीप प्रभावळकर चित्रपटात आजोबांच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कदम करत आहेत. ‘विटीदांडू’च्या परदेशातील प्रीमिअरबाबत त्यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले की, आपली संस्कृती, परंपरा आणि विस्मृतीत जाणारे खेळ यांचे दर्शन परदेशातील लोकांना व्हावे आणि त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘विटीदांडू’चा प्रीमिअर परदेशात करण्याचे ठरविले आहे.  

Story img Loader